परभणी जिल्हा काँग्रेसमध्ये जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या कार्यपद्धतीवरून अंतर्गत संघर्ष उफाळला आहे.
जिल्हा परिषदेतील काँग्रेस गटनेता बदलाच्या निर्णयावरून पदाधिकाऱ्यांनी प्रदेश कार्यालयात तक्रार केली.
प्रदेश नेत्यांनी बाबाजानी दुर्राणी यांना गटनेता बदलण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट करत पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला.
Parbhani Congress News : परभणी जिल्हा काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत संघर्ष मोठ्या प्रमाणात उफाळून आला आहे. जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्याची मागणी करत जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी थेट प्रदेश कार्यालयाकडे त्यांची तक्रार केली. जिल्हा परिषदेतील काँग्रेसचा गटनेता बदलासाठी बाबाजानी यांनी कोणालाही विश्वासात न घेता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिल्यामुळे पक्षात नवा वाद निर्माण झाला आहे.
अखेर प्रदेश नेत्यांनी बाबाजानी दुर्राणी यांना काँग्रेसचा जिल्हा परिषदेतील गटनेता बदलण्याचे कुठलेही अधिकार नसल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांना दिलासा दिला आहे. बाबाजानी दुर्राणी यांनी परभणी जिल्हा परिषदेमधील काँग्रेस गटनेता बदलण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या पत्रावरून राजकीय संघर्ष उभा राहिला आहे. प्रदेश नेतृत्वाने थेट हस्तक्षेप करत दुर्राणी यांना गटनेता बदलण्याचा कोणताही अधिकार नसल्याचे स्पष्ट केल्याने जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वाद उघड झाला आहे.
अॅड. गणेश पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या अधिकृत हरकतीत विद्यमान गटनेता अजित वरपूडकर यांना हटविण्याचा कोणताही निर्णय पक्षाने घेतलेला नसल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. उलट, दुर्राणी यांनी प्रदेशाध्यक्षांची पूर्वपरवानगी न घेता केलेली कारवाई ही पक्षघटनेविरोधी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
प्रदेश काँग्रेसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, जिल्हा पातळीवर काही नेत्यांनी स्वतंत्र राजकीय समीकरणे जुळवण्याचा प्रयत्न सुरू केला असून त्यातूनच गटनेता बदलाचा डाव आखण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, प्रदेश नेतृत्वाने हा प्रयत्न वेळेत हाणून पाडण्याची भूमिका घेतल्याने जिल्ह्यातील राजकारण तापले आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अर्हता अधिनियम 1986 आणि नियम 1987 नुसार गटनेता बदलण्यासाठी ठराविक कायदेशीर प्रक्रिया आवश्यक असते.
केवळ प्रभारी अध्यक्ष म्हणून कोणालाही थेट पत्र देऊन गटनेता बदलण्याचा अधिकार नसतो. त्यामुळे बाबाजानी दुर्राणी यांनी केलेली हालचाल कायदेशीरदृष्ट्याही टिकणार नसल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. याचबरोबर काँग्रेस पक्षाच्या नियमावलीनुसार पक्षनेता किंवा गटनेता बदलण्यासाठी पक्षाच्या मार्गदर्शक समितीच्या देखरेखीखाली अधिकृत बैठक व ठराव आवश्यक असल्याचेही प्रदेश नेतृत्वाने स्पष्ट केले.
या प्रकरणात अशी कोणतीही प्रक्रिया न झाल्याने दुर्राणी यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांची कोणतीही मंजुरी नसताना गटनेता बदलाचे पत्र देण्यात आल्याने प्रदेश नेतृत्व नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा काँग्रेसमध्ये संघटनात्मक कारवाईची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे.
जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी कोणालाही विश्वासात न घेता गटनेता बदलासाठी पत्र दिल्यामुळे वाद निर्माण झाला.
काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाकडे थेट तक्रार करण्यात आली.
त्यांच्यावर मनमानी कारभार आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेण्याचे आरोप आहेत.
प्रदेश नेत्यांनी बाबाजानी दुर्राणी यांना गटनेता बदलण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट केले.
पक्षातील गटबाजी वाढण्याची शक्यता असून आगामी निवडणुकांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.