

Shivsena News : परभणी महापालिकेकडून वांगी रोडवरील अपनानगरातील मारुती मंदिर हटविण्यासह येथील पंचरंगी ध्वज काढल्याप्रकरणी बुधवारी (ता.25) हिंदुत्ववादी संघटना व आंबेडकरी संघटनांनी मनपावर मोर्चा काढला. या मोर्चाला सामोरे जातांना आयुक्त नितीन नार्वेकर यांनी हनुमान मूर्तीची नव्याने प्रतिष्ठापणा आणि पंचरंगी ध्वज पुन्हा लावण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर संघटनांनी आंदोलन मागे घेतले.
परभणी महानगरपालिकेने मंगळवारी(ता.24) पहाटे तीनच्या सुमारास अपनानगर येथील मारुती मंदिराचा ओटा, शेड काढून हनुमानाची मूर्ती ताब्यात घेतली. हा प्रकार समजताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या. शिवसेना व विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच अपनानगर येथील नागरिकांनी मनपास टाळे लावून ठिय्या आंदोलन केले. यावेळी मनपात एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हता हे विशेष. त्यामुळे या संघटना अधिकच आक्रमक झाल्या.
यावेळी आयुक्तांच्या दालनासमोरील खुर्च्यांसह केबिनच्या काचांचीही तोडफोड करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अधिकचे नुकसान टळले. पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले होते. या प्रकरणी दहा-बारा जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती आहे.
अपनानगर येथे पुन्हा हनुमानाच्या मूर्तीची विधिवत पद्धतीने प्रतिष्ठापना करावी या मागणीसाठी बुधवारी हिंदुत्ववादी संघटनांनी शिवसेनेचे आनंद भरोसे, विश्व हिंदू परिषदेचे अनंत पांडे, राजकुमार भांबरे, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांच्या नेतृत्वाखाली मनपावर मोर्चा काढला. त्याचबरोबर अपनानगर येथील पंचरंगी ध्वज हटविल्यामुळे आंबेडकरी संघटनांनी आशिष वाकोडे, माजी सभापती रवींद्र सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली या आंदोलनात सहभाग घेतला.
यावेळी आयुक्त नितीन नार्वेकर यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासह पंचरंगी ध्वज लावण्याचे आश्वासन दिल्याने तूर्तास आंदोलनास स्थगित करत असल्याचे या संघटनांनी सांगितले. दरम्यान, या प्रकरणावर शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांनी ही घटना महापौरांच्या आदेशाने झाल्याचा आरोप केला होता. त्याला ठाकरे सेनेचे महापौर सय्यद इकबाल यांनी प्रत्युत्तर दिले.
मनपा प्रशासनाकडून या कारवाईबाबत आपणास काहीही माहिती देण्यात आली नव्हती. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील त्यांनी दिला.
त्याचबरोबर ठाकरेसेना महिला आघाडीच्या नेत्या अंबिका डहाळे म्हणाल्या, की ही बाब निंदनीय आहे. तिचे समर्थन कुणीही करणार नाही. परंतु शिंदेसेना राजकारण करीत आहे. मनपावर ठाकरेसेनेची सत्ता आल्याने त्यांचा पोटशूळ उठला आहे, असा आरोप त्यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.