

कंत्राटदारांकडून दिरंगाई, निधीचीही कमतरता; परभणी जिल्ह्यात जलजीवन योजनेची कामे रखडली!
Assembly Session 2025 : परभणी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशन योजनेतील अनेक कामे रखडली आहेत. याला कंत्राटदारांची दिरंगाई, निधीची कमतरता ही प्रमुख कारणे असल्याची कबुली पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी 264 कोटींचा निधी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजेश विटेकर यांनी विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना पाणीपुरवठा मंत्र्यांनी लवकरच निधी मिळेल, असे आश्वासन दिले आहे.
जलजीवन योजनेच्या अडीचशेहुन अधिक रखडलेल्या कामाला कंत्राटदारांची दिरंगाई कारणीभूत असल्याचे मान्य करतानाच 147 कंत्राटदारांकडून 1 कोटी 67 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याचेही गुलाबराव पाटील यांनी सांगीतले. परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या कामांवर आतापर्यंत 358 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी आणखीन 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे.
परभणी जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत एकूण 691 कामांना मंजूरी देण्यात आली होती. यापैकी 430 कामे पूर्ण झाली असून उर्वरित 261 कामे अपूर्ण आहेत. या कामांसाठी आणखी 264 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. आतापर्यंत परभणी जिल्ह्यातील जलजीवन मिशनच्या विविध कामांवर 358 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
पाणीपुरवठा योजनेची अनेक कामे ही 50 टक्क्यांच्या आत आहेत. जिल्ह्यात 167 कंत्राटदार या कामांसाठी नियुक्त करण्यात आले होते. परंतु मुदतीत कामे पूर्ण न केल्यामुळे तब्बल 147 कंत्राटदारांना दंड आकारण्यात आला. त्यांच्याकडून एक कोटी 67 लाख रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहितीही गुलाबराव पाटील यांनी आपल्या लेखी उत्तरात दिली.
जलजीवन मिशनच्या कामांसाठी केंद्र सरकारकडून त्यांच्या विषयाची रक्कम दिली जाते ती मिळवण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री यांनी अतिरिक्त नियतव्य वाढवून देण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू केली आहे. तर राज्य सरकारच्या हिश्याची रक्कम अर्थसंकल्पात मंजूर होताच उर्वरित निधी वर्ग करण्यात येईल, असेही गुलाबराव पाटील यांनी आपल्या उत्तरात सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.