गणेश पांडे
Parbhani ZP Result News, 09 Feb : परभणी जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांना मतदारांनी अभूतपूर्व असा धक्का दिला आहे. या निवडणुकीत वरपुडकर यांचे पुत्र समशेर वरपुडकर, मुलगी सोनल देशमुख, सून प्रेरणा समशेर वरपुडकर आणि पुतणे उत्कर्ष विजयराव वरपुडकर यांचा एकाच वेळी पराभव झाला आहे.
सिंगणापूर गटातून भाजपचे उमेदवार समशेर वरपुडकर यांना शिवसेनेचे पांडूरंग खिल्लारे यांनी पराभूत करत भाजपच्या गडालाच सुरुंग लावला. समशेर वरपुडकर यांना मिळालेला पराभव हा चर्चेला बळ देणारा ठरला आहे. झरी गटातून शिवसेना उबाठा पक्षाकडून निवडणुक लढविणाऱ्या वरपुडकर यांची मुलगी सोनल देशमुख यांना पराभव स्विकारावा लागला आहे. या ठिकाणी भाजपचे दिलीपराव देशमुख हे विजयी झाले आहेत.
दैठणा गटात भाजपकडून रिंगणात उतरलेल्या प्रेरणा समशेर वरपुडकर यांचा काँग्रेसच्या ज्योत्सना गणेश घाटगे यांनी दारूण पराभव केला. विशेष म्हणजे घाटगे या सुरेश वरपुडकर यांचे जुने निकटवर्तीय असलेल्या प्रा. रामभाऊ घाटगे यांच्या सूनबाई आहेत. त्यामुळे हा पराभव जिव्हारी लागणारा आहे. लोहगाव गटात भाजपचे उमेदवार उत्कर्ष विजयराव वरपुडकर यांना काँग्रेसचे अजित अनिलराव वरपुडकर यांनी चितपट केले.
एकाच आडनावाचे दोन उमेदवार समोर असतानाही मतदारांनी कोणतीही भावनिकता न ठेवता स्पष्ट निर्णय दिला, जिल्ह्यातील अनेक वर्षांची सत्ता, प्रभाव आणि दबदबा असूनही मतदारांनी घराणेशाही नको, काम करणारे नेतृत्व हवे असा स्पष्ट संदेश दिला आहे. परभणीच्या राजकारणात आता नवे चेहरे आणि नवी समीकरणे आकार घेत असल्याचे हे निकाल सूचित करत आहेत.
नगरपालिका, महापालिका निवडणुकीत अनेक ठिकाणी मतदारांनी घराणेशाहीला नाकारले, तर काही ठिकाणी स्वीकारले. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात एकाच घरात उमेदवारी देण्याचे प्रकार समोर आले होते. परभणी जिल्हा परिषदेमध्ये भाजपचे नेते माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांच्या घरातील पाच जणांना उमेदवारी देण्यात आली होती. यावरून भाजपावर टीकेची झोड उठवली जात होती. अखेर मतदारांनीच वरपूडकरांच्या घरातील पाच पैकी चार उमेदवारांना घरी बसवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.