Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून चौथ्यांदा निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर भाजपाचे प्रशांत बंब तुटून पडले आहेत. शिक्षकांच्या मुख्यालयी उपस्थित न राहण्याचा मुद्दा लावून धरत मराठवाडा पदवीधर मतदारसंघच नको, अशी भूमिका बंब यांनी घेतली होती.
गेल्यावर्षी सतीश चव्हाण, शिक्षक आमदार विक्रम काळे आणि शैक्षणिक संघटनांनी प्रशांत बंब यांच्याविरोधात मोठा मोर्चा काढला होता. या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवत आता मराठवाडा पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर होताच प्रशांत बंब आक्रमक झाले आहेत.
सतीश चव्हाण यांची आमदार होण्याची लायकीच नाही, असा थेट आरोप करत पदवीधरांनी त्यांना आता घरी बसवावे, असे आवाहन बंब यांनी केले आहे. आपल्या मतदारसंघात पत्रकार परिषद घेत त्यांनी सतीश चव्हाण यांनी अठरा वर्षे पदवीधरचे आमदार म्हणून काय काम केले? ते सांगावे, असे जाहीर आव्हानच बंब देत आहेत.
राज्यात भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युतीचे सरकार आहे. परंतु राज्य पातळीवरची ही युती स्थानिक पातळीवर कशी गळून पडते हे नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत दिसून आले होते. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीत प्रशांत बंब यांच्याविरोधात गंगापूर-खुलताबादमधून लढण्यासाठी चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.
या सगळ्या खेळींचा बदला घेण्याची संधी बंब यांनी हेरली आहे. स्वार्थाचे राजकारण करत एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उड्या मारण्याचे काम त्यांनी केले. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी काय प्रयत्न केले? पदवीधरांच्या रोजगारासाठी कोणते प्रयत्न केले? याची माहिती सतीश चव्हाण यांनी सार्वजनिक करावी, असेही बंब म्हणाले.
सतीश चव्हाण यांनी आपल्या १८ वर्षांच्या कार्यकाळातील कामांची श्वेतपत्रिका काढून ती जनतेसमोर सादर करावी. मी चार वेळा या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलो आहे. दर पाच वर्षांनी मी केलेल्या कामांची आणि पुढील काळात करणार असलेल्या कामांची माहिती जनतेसमोर ठेवतो, असे सांगत बंब यांनी सतीश चव्हाण यांना आव्हान दिले.
सतीश चव्हाण यांनी नातेवाईकांना कंत्राटे मिळवून देण्यासाठी आणि स्वत:च्या शैक्षणिक संस्थांना फायदा करून देण्यासाठी राजकारण केल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांना माझे खुले आव्हान आहे. त्यांनी केलेले एक तरी काम दाखवावे, अन्यथा मी केलेली कामे जनतेसमोर दाखवतो, असे बंब म्हणाले.
भाजपाचा उमेदवार द्यायचा का? पक्षश्रेष्ठी ठरवतील...
भाजपचा उमेदवार द्यायचा की नाही? याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार मी काम करणार आहे, असे प्रशांत बंब यांनी स्पष्ट केले. मात्र, महायुतीकडून सतीश चव्हाण यांनाच उमेदवारी मिळाल्यास त्यांच्या प्रचारासाठी जाणार का? या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट उत्तर देणे टाळले. तसेच सतीश चव्हाण आपल्याला प्रचारासाठी बोलावणार नाहीत, असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.