

संतोष शेंडकर
सोमेश्वर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीने शेवटच्या दिवशी नाट्यमय वळण घेतले. मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाशी न जमल्याने बिनविरोध निवडणुकीची शक्यता मावळली होती. अशात विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी बुधवारी सकाळी कार्यकर्त्यांचा स्वतंत्र संवाद मेळावा घेत खळबळ उडवून दिली आणि स्वतंत्र पॅनेलची घोषणा केली.
यावर राष्ट्रवादी काँग्रेसनेही उमेदवार यादी जाहीर करण्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा बोलवत त्यावर कडी केली. यामुळे सोमेश्वरचे महिनाभर शांत असलेले कार्यक्षेत्र एका रात्रीच्या घडामोडींनी हादरून गेले आहे.
सोमेश्वर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून 1 ऑक्टोबरला अंतिम उमेदवार यादी प्रशासनाकडून निश्चित होणार आहे. त्यासाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आज 30 ऑक्टोबर आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवस आधी पक्षानी अंतिम 21 उमेदवारांची यादी जाहीर करणे अपेक्षित होते.
काल कार्यकर्ते याची अत्यंत आतुरतेने वाट पहात होते. परंतु कालपासून अकल्पित घडामोडी घडल्या आणि एकतर्फी वाटणाऱ्या आणि बिनविरोध होईल अशा वाटणाऱ्या निवडणुकीत कमालीचे रंग भरले असून वातावरण ढवळून निघाले आहे.
सोमवारी खासदार पार्थ पवार यांची बारामतीत सोमेश्वरच्या निवडणुकीत एंट्री झाली. इच्छुक मंडळी त्यांना भेटली. संजय जगताप यांच्यासह भाजपाला सोबत घेण्याचे ठरले होते आणि त्यानुसार अंतिम यादीवर हात फिरला होता. यानंतर सोमवारी रात्रीही यादीवर खलबते झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेही चाचपणी करत 21 उमेदवारांची शोधाशोध स्वतंत्रपणे केली होती.
मंगळवारी मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या प्रमुखांची बिनविरोधसाठी मॅरेथॉन चर्चा झाली. जागावाटपावरून मेळ न बसल्याने बोलणी फिस्कटली. पण यानंतरही काल दोन्ही गटानी आपापल्या स्वतंत्र उमेदवारी याद्या जाहीर केल्या नाहीत. किमानपक्षी आज सकाळी याद्या जाहीर होतील, अशी सभासदांना खात्री होती. पण आज सकाळपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीची यादी जाहीर झाली नव्हती. त्यातच आता तिसऱ्या गटाची भर पडली आहे.
सोमेश्वरचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप हे उमेदवार यादीतील काही नावाबद्दल नाराज झाले होते, असे समजते. या वादास काकडे-जगताप या संघर्षाचीही किनार आहे. जगताप यांनी 'ते असतील तर मी नको' अशी भूमिका घेतल्याची तर पार्थ पवार हे 'त्या' नावांबाबत ठाम असल्याची चर्चा आहे. यावरून मंगळवारी रात्री व मध्यरात्रींनंतर राष्ट्रवादीच्या काही ज्येष्ठ नेत्यांनी पुरुषोत्तम जगताप यांच्याशी चर्चा केल्या मात्र मार्ग निघाला नाही.
दरम्यान, आज सकाळी पुरुषोत्तम जगताप यांनी अकरा वाजता वाणेवाडी येथे संवाद मेळावा असल्याचे जाहीर केले तर राष्ट्रवादीने राष्ट्रवादी भवन मध्ये पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा घोषित केला. भाजपा नेते संजय जगताप यांच्यासोबत ते बंड करणार, प्रसंगी वेगळा पॅनेल करणार अशा चर्चा सकाळी वेगाने पसरल्या. राष्ट्रवादीनेही पक्ष कार्यकर्ते एकत्र करत सावधगिरीने पण आक्रमक पावले टाकली.
जगताप यांची नाराजी पाहता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सूचनेनुसार छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांना त्यांची समजूत घालण्यासाठी पाठवले. मात्र त्यांनाही यामध्ये अपयश आले. यानंतर भाजपा नेते संजय जगताप वाणेवाडी येथे दाखल झाले आणि त्यांनीही बंद दाराआड चर्चा केल्या.
यानंतर पुरुषोत्तम जगताप व संजय जगताप यांनी पक्षविरहित अजितदादा शेतकरी विकास पॅनेल स्थापन केल्याचे जाहीर केले आणि नाट्यमयतेचा कळस गाठला. पुरुषोत्तम जगताप यांचे हे बंड राष्ट्रवादीसाठी, सुनेत्रा पवार यांच्यासाठी धक्कादायक असून आता घड्याळ, तुतारी आणि अध्यक्ष गट अशा तिरंगी लढतीचे चिन्ह स्पष्ट झाले.
पुरुषोत्तम जगताप यांनी जाहीर केलेल्या संवाद मेळाव्याच्या ठिकाणी उत्साही कार्यकर्त्यांकडून 'लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल' असा बॅनर लावण्यात आला होता. तो सोशल मिडीयात व्हायरल झाल्यावर खळबळ उडाली होती. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संदीप बांदल यांनी तातडीने पत्र काढत, अजितदादा पवार यांच्या कुटुंबाच्या परवानगीशिवाय त्यांचे नाव वापरू नये अशी परखड भूमिका घेतली. यानंतर तो बॅनर संवाद मेळाव्यातून हटवला गेला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.