
Nanded Politics : भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या मेळाव्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्वबळावर लढण्याचा इरादा बोलून दाखवला. नांदेड जिल्ह्यात आणि राज्यात भाजपाची ताकद वाढली आहे. राज्यात महायुतीची सत्ता,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर केंद्रात भाजपाचे सरकार आहे. त्यामुळे ताकदीने लढलो तर आपण स्वबळावर जिल्ह्यात सत्ता मिळवू शकतो, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला.
यावर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने टीकेचा बाण सोडल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) हे ही मैदानात उतरले आहेत. अशोक चव्हाण यांना स्वबळावर लढण्याची एवढीच खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी देखील तयार असल्याचे सांगत चिखलीकरांनी त्यांना आव्हान दिले. अशोक चव्हाण यांनी ते भाजपाचेच नेते आहेत का? हे आधी तपासावे असा, टोलाही चिखलीकर यांनी लगावला.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर नांदेड जिल्ह्यात महायुतीने महाविकास आघाडीला व्हाईट वॉश देत सर्व जागा जिंकल्या. मात्र हे यश महायुतीला पचवता येत नाही असे चित्र दिसते. भाजपाचे खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) हे जिल्ह्यातील पक्षाची सगळी सूत्र आपल्या हाती ठेवण्याच्या प्रयत्नात आहेत. कन्या श्रीजया चव्हाण यांना आमदार केल्यानंतर अशोक चव्हाण यांचा कॉन्फिडन्स कमालीचा वाढला आहे. यातूनच त्यांनी जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची तयारी स्वतंत्रपणे सुरू केल्याचे दिसते.
भाजपाच्या एका मेळाव्यात स्वबळाची भाषा करत जिल्ह्यातील सत्तेत दुसरा वाटेकरी नको, अशी भूमिका चव्हाण यांची यातून दिसून आली. त्यांच्या स्वबळावर शिवसेनेचे आमदार तथा विधान परिषदेतील गट नेते हेमंत पाटील यांनी सर्वप्रथम टीकेचा बाण सोडला. अशोक चव्हाण म्हणजे भाजप नव्हे, अशा शब्दात पाटील यांनी त्यांच्या स्वबळाचा समाचार घेतला. नांदेड उत्तरचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर यांनीही अप्रत्यक्षरित्या अशोक चव्हाण यांना टारगेट करत भाजप मध्ये आलेल्या नव्या लोकांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या विरोधात काम केले, पैसे वाटले असा आरोप करत खळबळ उडवून दिली.
हे कमी की काय? म्हणून आता अशोक चव्हाण यांचे जिल्ह्यातील पारंपारिक कट्टर विरोधक असलेले आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनीही अशोक चव्हाण यांच्या स्वबळाच्या निर्णयाचा समाचार घेतला. स्वतंत्र लढण्याची कुणात खुमखुमी असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसही तयार असल्याचे चिखलीकर यांनी म्हटले आहे. शिवाय अशोक चव्हाण यांनी ते भाजपाचेच नेते आहेत का? हे तपासावं असा टोला लगावला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण यांनी भाजप मध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पराभवाने प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाण यांच्यातील संबंध ताणले गेले.
यातूनच चिखलीकर यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत लोहा कंधार मधून उमेदवारी मिळवली होती. महायुतीने जिल्ह्यातील सगळ्याच जागा जिंकल्या त्यात चिखलीकरांचाही समावेश आहे. परंतु आपल्या विजयात इतर कोणाचा वाटा नसून आपण या मतदारसंघात केलेल्या विकास कामाच्या जोरावर निवडून आल्याचा दावा चिखलीकरांनी केला आहे. एकूणच आगामी महापालिका, जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये वर्चस्व वादाची लढाई होणार असे दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.