

Chhatrapati Sambhajinagar, 28 Nov : बेकायदा होर्डिंग आणि अतिक्रमणाविरोधात धडक मोहीम राबविणाऱ्या पुणे महापालिकेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. दुसरीकडे, भाजपची एकहाती सत्ता असलेल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेत मात्र शहर होर्डिंगमुक्त करण्याची घोषणा केवळ ‘नव्याचे नऊ दिवस’ ठरली आहे. सध्या शहरात कारवाईही नाही आणि गुन्हेही दाखल होत नसल्याने मुख्य चौकांसह गल्लीबोळ पुन्हा अनधिकृत फलकांनी विद्रूप झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेनंतर तरी महापालिका प्रशासन आणि पदाधिकारी काही बोध घेणार का? याविषयी उत्सुकता आहे.
छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने महापालिकेत पहिल्यांदाच भाजपला स्पष्ट बहुमत दिले. महापौरपदी विराजमान होताच समीर राजूरकर यांनी शहर होर्डिंगमुक्त करण्याचा संकल्प सोडत प्रशासनाला कारवाईचे आदेश दिले होते. त्यांनी स्वतःचे होर्डिंग न लावण्याची व बुके स्वीकारणार नाही, अशी घोषणा केली. त्यानुसार प्रशासनाने अनाधिकृत होर्डिंगच्या विरोधात मोहीम सुरू करत धडक कारवाया केल्या. दरम्यान, मुकुंदवाडी येथे एका मंदिरावरील अनधिकृत होर्डिंग काढताना महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेनंतर प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेत अनधिकृत होर्डिंग लावणाऱ्यांविरोधात थेट गुन्हे दाखल केले. मात्र, सणासुदीचा काळ सुरू होताच ही मोहीम पूर्णपणे बारगळली. दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनीही पुणे प्रशासनाच्या नुकत्याच सुरू केलेल्या ‘पुणेरी’ धाटणीतील उपक्रमाचे सोशल मीडियावरून कौतुक केले.'नियम केवळ शासकीय दस्तावेजात प्रकाशित करण्यासाठी नसतात, तर ते पाळायचे असतात.
उद्या माझ्या नावाचे बेकायदा होर्डिंग लागले, तर तुमच्या पुरस्कारांच्या यादीत माझेही नाव जाहीर करा. नेते असोत की कार्यकर्ते, ते कायम जनतेतच दिसले पाहिजेत, बेकायदा होर्डिंग्जवर नाही', अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला शाबासकी देत नेत्यांना कानपिचक्या दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर आता छत्रपती संभाजीनगर महापालिका प्रशासन आणि सत्ताधारी पुणे पॅटर्नचा आदर्श घेऊन पुन्हा एकदा धडक मोहीम राबवणार का? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
पुणे महापालिकेने अनधिकृत होर्डिंगविरोधात सुरू केलेली 'भाऊ, फ्लेक्स काढा' ही मोहीम सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरली आहे. नागरिकांना तक्रारी करता याव्यात यासाठी सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर तक्रारींचा पाऊस पडत असून, सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग लावल्याचा नकोसा पुरस्कार स्थायी समिती अध्यक्षांनाच मिळाल्याने या मोहिमेची धार स्पष्ट झाली आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेने यापूर्वीच बेकायदा होर्डिंगच्या विरोधात कारवाई सुरू केली आहे. ही कारवाई नियमितपणे सुरू राहणार आहे.
शहरातील सर्वच राजकीय पक्ष, पदाधिकारी तसेच नागरिकांनी छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छ आणि होर्डिंगमुक्त ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर समीर राजूकर यांनी केले आहे. तर शहराचा-चेहरा मोहरा बदलण्यासाठी महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. सध्या जुन्या शहरातील अतिक्रमणे हटवून नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आगामी काळात अनाधिकृत होर्डिंगच्या विरोधात आक्रमकपणे कारवाई केली जाईल, असा शब्द स्थायी समितीचे सभापती अनिल मकरिये यांनी या निमित्ताने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.