

Sambhaji Nagar MNS News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची वीस वर्षानंतर अधिकृत राजकीय युती झाली आहे. यामुळं दोन्ही पक्षांच्या समर्थकांची सुप्त इच्छा पूर्ण झाल्याचं बोललं जात आहे. पण मुंबईत राज-उद्धव यांच्या एकत्र येण्यामुळं संभाजीनगरमध्ये मात्र खळबळ उडाली आहे. संभाजीनगरच्या मनसेच्या जिल्हाध्यक्षांनी आणि दोन शहरप्रमुखांनी पक्ष सोडत नवा घरोबा केला आहे.
जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी आपल्या फेसबुक पेजवर मोठा निर्णय घेत असल्याचे संकेत देणारी पोस्ट केली होती. जय महाराष्ट्र, मला छत्रपती संभाजीनगरसाठी काम करायचं आहे. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी प्रत्येकासाठी मी कायम सेवेत राहील. मनसेचा प्रत्येक कार्यकर्ता महत्वाचा आहे, मला दिलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचा ऋणी राहील. बाकी लवकरच बोलतो ही पोस्ट करत सुमीत खांबेकर यांनी मनसेच्या इंजिनातून बाहेर पडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याची माहिती आहे.
तर मनसे पूर्वचे शहर अध्यक्ष आशिष सुरडकर व पश्चिम शहर अध्यक्ष गजानन गौडा पाटील या दोन पदाधिकाऱ्यांनीही नेमका आजचा मुहूर्त साधत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेला छत्रपती संभाजीनगरमध्ये हा धक्का आहे. आधीच जिल्ह्यात मनसेची ताकद कमी होती, त्यातच आता प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ऐन महापालिका निवडणुकीत पक्ष सोडल्याने मनसेची कोंडी होणार आहे.
मनसेने मुंबई महापालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत युती केल्याचे जाहीर केले. इतर ठिकाणी काय? हा प्रश्न अनुत्तरित असताना सुमीत खांबेकर, आशिष सुरडकर आणि गजानन गौडा पाटील यांनी राज ठाकरेंची साथ सोडली.
उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी मुंबई प्रमाणेच इतर महापालिकांमध्येही मनसेसोबत युती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतू ठोस निर्णय होत नसल्याने अधिक वाट न पाहता या तीन पदाधिकाऱ्यांनी अनुक्रमे शिवसेना आणि भाजप पक्षाची वाट धरली आहे.
मनसेचे जिल्हाप्रमुख सुमित खांबेकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. सुमित खांबेकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. तर सुरडकर आणि गौडा पाटील यांनी ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.