

Jalna Politics : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, जालन्याचे खासदार कल्याण काळे यांच्यावर टीकेची एकही संधी सोडत नाहीत. राज्यात शिवसेना-भाजपाची युती असली तरी जालन्यातील शिवसेनेचे नेते भास्कर आंबेकर आणि काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांची मैत्री सर्वश्रुत आहे. यावरूनच दानवे यांनी एका जाहीर कार्यक्रमात 'मी सुरू केलेल्या सिटी रेल्वेकडे भास्करराव, तुमच्या मित्राला लक्ष द्यायला सांगा' असे म्हणत चिमटा काढला.
आज जालना शहरात सिटी बस सुरू झाली आहे. पण मी रेल्वेमंत्री असताना सिटी रेल्वे सुरू केली होती. जालन्यातून सकाळी जाणारी व्यक्ती पुण्यातील काम करून रात्री जालन्यात परतत होती. पुणे रेल्वे स्थानकापर्यंत रेल्वे सुरू केली होती. मात्र, भास्कर आंबेकर यांनी आमच्याकडे दुर्लक्ष करून मित्राला साथ दिली. त्यामुळे आता भास्करराव यांनी मित्राला सांगून मी सुरु केलेल्या त्या सिटी रेल्वेकडे लक्ष द्यावे, असा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.
२०२४ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून रावसाहेब दानवे यांची डबल हॅट्रीक हुकली. काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव केला. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा थेट सामना झाला होता. तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात असलेल्या भास्कर आंबेकर यांनी आघाडी धर्म पाळत काळे यांना साथ दिली होती.
लोकसभेतील सलग सहावा विजय हुकल्याने रावसाहेब दानवे यांच्या जिव्हारी हा पराभव लागला होता. खासदार कल्याण काळे यांना निवडून देऊन तुमचं काय भलं झालं, माझं तर बरं चाललंय, तुमचं कसं? असा चिमटा दानवे जाहीर भाषणातून मतदारांनाही काढत असतात.
खासदार डॉ. कल्याण काळे आणि शिवसेनेचे संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या या मैत्रीची आठवण ठेवत रावसाहेब दानवे यांनी आज संधी हेरलीच. जालना बसस्थानकावरून शहरात तीन सिटी बस सुरू करण्यात आल्या. सोमवारी या बससेवेचा शुभारंभ रावसाहेब दानवे, आमदार अर्जुन खोतकर, शिवसेनेचे संपर्कप्रमुख भास्कर आंबेकर, महापौर वंदना मगरे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी दानवे यांनी खासदार डॉ. कल्याण काळे आणि शिवसेना संपर्कप्रमुख आंबेकर यांना राजकीय कोपरखळ्या लगावल्या. लोकसभा निवडणुकीच्या वेळी भास्कर आंबेकर आमच्यासोबत नव्हते. त्यांनी त्यांच्या मित्राला निवडून आणले. आता ते आमच्यासोबत आहेत. पण भास्करराव यांची मैत्री अजूनही कायम आहे. त्यामुळे मी सुरू केलेली जालना-पुणे रेल्वे आता नांदेड-पुणे झाली आहे.
मी मंत्री असताना जालन्यातून पुण्यासाठी सकाळी जाणारी रेल्वे हडपसर येथे थांबत होती. हडपसर येथून पुण्यात जाण्यासाठी तिकिटापेक्षा अधिक खर्च येत असल्याने ही रेल्वे पुण्याच्या मुख्य रेल्वे स्थानकापर्यंत नेली. आता ही रेल्वे पुन्हा हडपसर येथे थांबण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भास्करराव यांनी त्यांच्या मित्राला सांगून रेल्वे पुणे स्थानकापर्यंत कशी जाईल, याची व्यवस्था करावी, असा टोला लगावला.
तसेच जालना-शिर्डी रेल्वेकडेही लक्ष द्यावे, असे त्यांनी सुचवले. माझ्या कार्यकाळात मी जालना रेल्वे स्थानकाचा प्रश्न मार्गी लावला. जालना-जळगाव, जालना-खामगाव या रेल्वेमार्गांचाही प्रश्न मार्गी लावला. आता सिकंदराबाद विभागातून मराठवाडा विभाग स्वतंत्र करावा, ही मागणी आहे.
सध्याचे खासदार आहेत, त्यांनी हा प्रश्न मार्गी लावला पाहिजे. यासाठी लोकसभेत आणि लोकसभेबाहेर हा प्रश्न लावून धरावा, असा सल्लाही दानवे यांनी यावेळी दिला. दरम्यान, दानवे यांच्या या टोलेबाजीने उपस्थितांचे चांगलेच मनोरंजन झाले. पण जाहीरपणे काळे, आंबेकर यांच्या मैत्रीचा उल्लेख करत दानवेंनी आंबेकरांची चांगलीच गोची केल्याचे दिसून आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.