

Jalna BJP Politics News : जालन्याचे खासदार कल्याण काळे हे दुबईत अडकल्याच्या बातम्या आल्यानंतर अनेकांनी चिंता व्यक्त केली. पण"मी सुखरूप आहे, चिंता करू नका", असे सांगत काळे यांनी आपल्या समर्थकांना दिलासाही दिला. पण ज्या रावसाहेब दानवे यांचा पराभव करून काळे खासदार झाले त्या रावसाहेब दानवे यांनी काळे यांच्या दुबईत अडकल्याच्या बातम्यांची खिल्ली उडवली.
कल्याण काळे हे दुबईत कशासाठी गेले, कोणासोबत गेले? ते कधी येणार यावर भाष्य करताना रावसाहेब दानवे यांनी त्यांची खिल्ली उडवली. 'कल्याण काळे हे दुबईत तिथल्या राजाशी चर्चा करण्यासाठी गेले आहेत. आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी काही प्रोजेक्ट ते या राजाकडून आणणार आहेत. पण आखाती देशातील युद्धामुळे दुबईचे राजे हे व्यस्त आहेत. ते निवांत झाले की कल्याण काळे त्यांच्याशी चर्चा करतील आणि जालना लोकसभा मतदारसंघासाठी प्रकल्प घेऊन येतील. त्यांच्यासोबत गेलेले लोक वेगळ्या विमानाने आणि काळे दुसऱ्या विमानाने परततील' असा टोलाही रावसाहेब दानवे यांनी काळे यांना लगावला.
2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत जालन्यातून रावसाहेब दानवे हे अनपेक्षितरित्या पराभूत झाले. मराठा आरक्षण, भाजपातील अंतर्गत विरोधक आणि मंगेश साबळे यांची जालना लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीने सलग सहाव्या विजयापासून रावसाहेब दानवे दूर राहिले. कल्याण काळे यांनी सव्वा लाखाहून अधिक मतांनी पराभव केला. दानवे यांच्यासाठी व त्यांच्या समर्थकांना हा मोठा धक्का होता. खासदार कल्याण काळे यांच्यावर आपण एक ते दीड वर्ष कुठल्याही प्रकारची टीका करणार नाही, असे दानवे यांनी आधीच स्पष्ट केले होते.
आता मात्र गेल्या काही महिन्यांपासून रावसाहेब दानवे हे कल्याण काळे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. मी मंत्री, आमदार, खासदार नसलो तरी जालना लोकसभा मतदारसंघासाठी कोट्यावधीचा निधी आणू शकतो. पण तुम्ही निवडून दिलेला खासदार कल्याण काळे तुमचे किती कल्याण करू शकतो, किती निधी आणू शकतो? असा खोचक टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला होता. त्यावर जालन्यात ड्रायपोर्ट आणण्याचे श्रेय घेणाऱ्या दानवे यांना ड्रायपोर्ट म्हणजे काय? हे तरी माहित आहे का? असा चिमटा काळे यांनी काढला होता.
मी दोन आमदारांचा बाप आहे, या दानवेंच्या विधानावरही आम्हाला काहीहीी शंका नाही, तुम्ही वारंवार हे का सांगता? असा टोला कल्याण काळे यांनी मध्यंतरी लगावला होता. जालना जिल्ह्यातील या दोन नेत्यांमधील हा राजकीय कलगितुरा रंगत असतानाच इराण-इस्त्राईल-अमेरिका युद्धामुळे दुबईत गेलेले काँग्रेसचे खासदार कल्याण काळे हे विमानसेवा रद्द झाल्यामुळे अडकून पडले. युद्धभूमीत मराठवाड्यातील खासदार अडकून पडल्याबद्दल चिंता व्यक्त होत असताना कल्याण काळे यांच्या संपर्क कार्यालयाकडून ते सुखरूप आहेत, दुबईतील हाॅटेलमध्ये सुरक्षित असल्याने काळजी करू नका, असे सांगण्यात आले होते.
केंद्र सरकारच्या अभ्यास दौऱ्यात काळे दुबईत गेल्याचे सांगण्यात येते. यावर रावसाहेब दानवे यांनी मात्र ते दुबईच्या राजाशी चर्चा करून लोकसभा मतदारसंघात प्रकल्प आणण्यासाठी गेल्याची टीका केली. दुसरीकडे कल्याण काळे यांनी पांडुरंगाच्या कृपेने याही चकव्यातून लवकरच आपल्या भेटीला येणार असल्याची पोस्ट करण्यात आली आहे.
अमेरिका, इस्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता आंतरराष्ट्रीय विमानसेवेवर झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द झाल्याने कल्याण काळे हे सध्या दुबईमध्ये अडकले आहेत.
27 फेब्रुवारी रोजी ते दिल्लीहून दुबईला गेले होते. मात्र त्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळीत झाल्या. कल्याण काळे आणि त्यांच्या कुटुंबातील एकूण सहा जण दुबईत अडकले. परंतु आपण पांडुरंगाच्या कृपेने सुखरूप असून याही चक्रव्यूहातून लवकरच आपल्या भेटीला येऊ असे काळे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.