तुषार पाटील
Raosaheb Danve News : दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन या मित्राच्या जोडीमुळेच मी राजकारणात आलो. कार्यकर्त्यामधे असलेले गुण हेरून त्याला संधी देण्याचं काम या दोघांनी केलं. राजकारणामध्ये मला 45 वर्षे झाली आहेत. सरपंच पदापासून ते केंद्रीय मंत्री पदापर्यंतच्या प्रवासात विविध क्षेत्रातील लोकांशी माझे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. माझ्या राजकीय प्रवासात मला घडवण्यात मुंडे-महाजन या मित्रांचा मोलाचा वाटा असल्याचे माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजपाचे जेष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी सरकारनामा ला बोलताना सांगितले.
जागितक मैत्री दिनाच्या निमित्ताने दानवे यांनी मुंडे-महाजन यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 80 च्या दशकात जेव्हा मी राजकारणात आलो त्यावेळी नेता हा कार्यकर्त्याप्रमाणे वागत असे, कार्यकर्त्याशी त्याचे अत्यंत मैत्री पूर्ण संबंध असायचे. एक चांगला नेता कार्यकर्त्याला चांगल्या प्रकारे घडवून भविष्यातील उत्तम नेता बनविण्याचे काम करत असे. दिवंगत नेते प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) ही माझी पहिली मित्रांची जोडी.
मुंडे- महाजन यांनी माझ्यामध्ये एका चांगल्या कार्यकर्त्याचे गुण उतरवले. भाजपाच्या संघर्षाच्या काळात आम्ही सोबत राहिलो. आंदोलन केली, सभा- बैठका, पक्षाचा प्रचार विविध विषयावर आमच्यामध्ये चर्चा व्हायची. यातून आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली. (Raosaheb Danve) प्रमोद महाजन हे दूरदृष्टीचे नेते होते. त्यांना लक्षात आले की हा ग्रामीण भागातील छोटा कार्यकर्ता भविष्यात चांगला नेता होऊ शकतो. हे हेरूनच त्यांनी मला विधानसभेतून थेट लोकसभेत पाठवले.
1979 चा काळ होता तेव्हा प्रमोद महाजन आणि मी पक्षाच्या प्रचारासाठी अनेकदा सोबत फिरत होतो. भोकरदन तालुक्यातील शेलुद या गावात प्रचारासाठी आम्ही एकदा रात्री मुक्काम केला. सोबत फक्त शिदोरी आणि अंगावरचे कपडे होते. शेलूद येथून सकाळी निघण्यापुर्वी आम्ही दोघांनी कपडे धुतले. नंतर तेच कसेबसे वाळलेले कपडे घालून पुढच्या प्रचाराला निघायचो. प्रमोद महाजन राष्ट्रीय राजकारणात गेल्यानंतर गोपीनाथराव मुंडे माझे दुसरे सोबती बनले.
प्रचारासाठी आम्ही दोघे जीप वापरत होतो. जुनी जीप असल्याने त्याकाळत या जीपमध्ये डायनोमा असायचा तो बऱ्याचदा खराब व्हायचा. मग प्रचाराला निघण्यापुर्वी दररोज सकाळी जीपला धक्का मारावा लागायचा. तेव्हा आम्ही जीपला धक्का मारायचो, यातून आमचा व्यायाम सुद्धा व्हायचा, अशी आठवण रावसाहेब दानवे यांनी सांगितले. मुंडे-महाजन यांच्या प्रमाणेच पक्षातील दुसरे ज्येष्ठ नेते दिवंगत भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत खामगाव ते आमगाव शेतकऱ्यांच्या पायी काढण्यात आलेल्या दिंडीत मी त्यांचा सोबती होतो. यानंतर आमची चांगली गट्टी जमली होती. आज हे माझे जुन्या काळातले सर्व सोबती या जगात नसले तरी मैत्री दिनाच्या निमित्ताने त्यांच्या आठवणी हृदयात कायम आहेत.
संजय राऊत अन् मी दिल्लीतले शेजारी..
शिवसेनेचे प्रवक्ते राज्यसभेतील खासदार संजय राऊत नेहमीच भाजपवर टीका करतात. पण मी आणि राऊत दिल्लीत एकमेकांचे शेजारी आहोत. आमचे बंगले जवळजवळच आहेत. दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला आम्ही सोबत असयाचो. रात्री अनेकदा आम्ही जेवणही सोबत केले आहे. आमचे पक्ष व राजकीय भूमिका वेगळी मात्र आमच्यातील मैत्री आजही कायम आहे.
बहुतांश काळ मी विरोधी पक्षात काम केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे दिल्लीत असत तेव्हा सरकारी कामकाजासाठी दिल्लीमध्ये मराठी माणसाचं हक्काचं घर म्हणून आम्ही शरद पवार यांच्याकडे बघत होतो. विरोधी पक्षात असून सुद्धा शरद पवारांनी नेहमीच सहकार्य केले, याचा आवर्जून उल्लेख रावसाहेब दानवे यांनी केला. प्रकाश जावडेकर आणि मी आम्ही दोघांनी जीपच्या टपावर बसून शेतकरी कर्जमाफीसाठीच्या आंदोलनात भाषणं केल्याचे दानवे यांनी सांगीतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.