Friendship Day Special News : शिवसेनेचे विद्यमान आमदार प्रदीप जैस्वाल आणि माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची बालपणापासून सोबत गोट्या, पतंग, भवरे खेळत जमलेली गट्टी तब्बल 45 वर्षानंतरही कायम आहे. राजकारणात कधी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तर कधी गळ्यात गळे घालून सोबत फिरले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील राजकारणात आमदार प्रदीप जैस्वाल हे 'पिया' तर माजी आमदार किशनचंद तनवाणी 'किशू' नावाने परिचित आहेत.
संभाजीनगर शहराचे हृदयस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलमंडीवरून या दोघांनी आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केला. महानगरपालिकेच्या निवडणुकीत किशनचंद तनवाणी यांना गुलमंडी वार्डातून उमेदवारी मिळावी म्हणून प्रदीप जैस्वाल (Pradip Jaiswal) यांनी प्रयत्न केले आणि तनवाणी पहिल्यांदा नगरसेवक झाले. पुढे विधान परिषदेवर आमदार होण्यासाठीही प्रदीप जैस्वाल यांनी आपल्या या मित्राला मोलाची साथ दिली. जैस्वालही महापालिकेच्या राजकारणातून नगरसेवक, महापौर झाले. त्यावेळी त्यांना तनवाणी यांनी भक्कम साथ दिली.
आज दोघंही राजकारणात यशस्वी नेते म्हणून ओळखले जातात. महापालिका निवडणुकीत भक्कम पाया रचल्यानंतर 1999 च्या विधानसभा निवडणुकीत प्रदीप जैस्वाल यांना तिकीट मिळावे म्हणून किशनचंद तनवाणी (Shivsena) यांनी उपोषण केले. उद्धव ठाकरे यांची भेटी घेतली पण त्यावेळी यश आले नाही. कालांतराने मात्र प्रदीप जैस्वाल खासदार झाले, अशी आठवण तनवाणी सांगतात.
किशन तनवाणी यांचा शिवसेनेतील प्रवास शहराध्यक्ष, नगरसेवक महापौर असा राहिला. त्यानंतर विधान परिषदेवर निवडून येत तनवाणी यांनी पडद्यामागील राजकारणात आपण कसे माहीर आहोत हे दाखवून दिले. दुसऱ्यांदा मात्र त्यांना ती किमया पुन्हा साधता आली नाही. 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने प्रदीप जैस्वाल यांच्याऐवजी विकास जैन यांना उमेदवारी दिली. यावेळी प्रदीप जैस्वाल यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली.
परंतु पक्षाचा शहराध्यक्ष असल्याने जैस्वाल यांच्या सोबत असलेली मैत्री विसरून मी पक्षाचे काम केले. विकास जैन यांच्यासाठी प्रचार केला, पण मात्र लोकप्रियता आणि लोकांच्या मदतीला कायम धावून जाण्याच्या गुणांमुळे प्रदीप जैस्वाल यांनी बाजी मारली आणि ते निवडून आले. पण निवडणुकीत मित्र असूनही मी त्यांचे काम केले नाही म्हणून कधी तक्रार किंवा नाराजी त्यांनी माझ्याकडे व्यक्त केली नाही, किंवा त्याचा परिणामही आमच्या मैत्रीवर कधी झाला नाही.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युती तुटली. किशनचंद तनवाणी शिवसेनेतून बाहेर पडले आणि ऐनवेळी भाजपाने त्यांना विधानसभेची उमेदवारी देत मध्य विधानसभा मतदारसंघातून मित्राच्या म्हणजेच प्रदीप जैस्वाल यांच्या विरोधातच उभे केले. एकमेकांच्या विरोधात लढले आणि हरले पण दुसऱ्याच दिवशी दोघे एकमेकांना भेटले याचा अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण मैत्रीच्या आड राजकारण आणायचे नाही हे पथ्य दोघांनी पाळल्यामुळे आमची निस्वार्थ मैत्री टिकून असल्याचे तनवाणी अभिमानाने सांगतात
आजही सोबत पतंगबाजी- जैस्वाल
किशनचंद तनवाणी यांच्यासोबत असलेल्या मैत्रीबद्दल प्रदीप जैस्वाल भरभरून बोलतात. आमची मैत्री कौटुंबिक आहे, राजकारणातल्या यश-अपयशाचे सावट कधी आम्ही त्यावर पडू दिले नाही. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. नशिबापलीकडे कुणाला काही मिळत नसते त्यामुळे जय पराजय यापेक्षा मैत्रीला आम्ही अधिक महत्त्व देतो. 45 वर्षांपासून मी आणि किशू न चुकता बालाजीच्या दर्शनाला सोबत जातो. आमची कुटुंबही जोडली गेली आहेत.
आजही संक्रांतीला मी किशूकडे पतंग उडवायला जातो. राजकारणापलीकडची ही आमची मैत्री अशीच कायम राहील, असा विश्वास दोघंही व्यक्त करतात. 'सलामत रहे दोस्ताना हमारा' अशा दोघांच्या भावना आजही कायम आहेत. राज्यात शिवसेनेत फूट पडली तेव्हा प्रदीप जैस्वा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत तर किशनचंद तनवाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु 2014 मध्ये जे घडले ते पुन्हा घडू नये, हिंदू मतांचे विभाजन टळावे या भूमिकेतून तनवाणी यांनी जाहीर झालेली उमेदवारी नाकारली आणि पुन्हा एकदा आपल्या मित्राला मदतीचा हात दिला. त्यामुळे मध्य विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या विरोधात प्रदीप जैस्वाल यांचा विजय सोपा झाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.