सुषेन जाधव
Chhatrapati Sambhajinagar News : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागलं आहे. त्याचवेळी महायुतीतलंही कुरघोडी,नाराजीचं डोकं वर काढल्याचंही दिसून येत आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मोठं विधान केलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भवनात कार्यकर्त्यांचा मेळावा नूतन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मेळाव्यानंतर आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्याबद्दल विचारले असता, पवार म्हणाले, शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी पक्ष, घड्याळ चिन्ह ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मिळेल, अशी त्यांना भीती आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांत बारा वाजल्याची स्थिती आहे.
शिवसेना पक्ष, ‘धनुष्यबाण’ चिन्ह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह ‘घड्याळ’ हे चिन्ह यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी लवकरच सुरू होईल. यात पक्षासह चिन्ह दोन्ही जातील. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाला भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सरटिचणीस तथा आमदार रोहित पवार यांनी केला. महत्त्वाचे म्हणजे, निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असेही पवार म्हणाले.
शिंदे यांच्या मंत्र्यांना आयकरच्या नोटिसा पाठविण्यात आल्या असून, भाजप त्यांना ‘टार्गेट’ करीत आहे. पक्ष आणि चिन्ह गेले तर एकनाथ शिंदे व अजित पवार यांना भाजपमध्ये जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही. तसेच ‘धनुष्यबाण’ आणि ‘घड्याळ’ चिन्हावर निवडून आलेल्या आमदारांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागेल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी सुरवातीला रॅपिडो कंपनीला फटकारले. महाराष्ट्रात हे चालणार नसल्याचा दम कंपनीला दिला. परंतु, स्वतःच्या फाउंडेशनतर्फे आयोजित प्रो गोविंदा स्पर्धेसाठी रॅपिडो कंपनीचे प्रायोजकत्व स्वीकारून दहा कोटी रुपये घेतले, असा गंभीर आरोप पवार यांनी केला.
रॅपिडो कंपनीच्या मुंबईत मोटारसायकल, टॅक्सीला परवानगी नसताना वाहतूक सेवेला परवानगी दिली कशी? असे सरनाईक यांनी विचारले होते. त्याच मंत्र्यांनी प्रो-गोंविदा लीगसाठी दहा कोटी रुपये घेतले. यासाठी धमकी दिली होती का? परिवहनमंत्री असताना अशा धमकी देत असाल तर पदाचा गैरवापर केल्याबद्दल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी चौकशी केलीच पाहिजे, अशी मागणीही पवार यांनी केली.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने सर्वच पक्षाकडून सध्या लगीनघाई सुरु आहे. त्यातच आगामी काळात होत असलेली निवडणूक महायुती एकत्रित लढणार असल्याने आता तयारीला वेग आला आहे. त्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत पीएम नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर आता एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर आले आहेत. त्यासोबतच त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.