
Shiv sena News : लोकसभा निवडणूक होऊन दहा महिने उलटून गेले. महाराष्ट्रात अन् मराठवाड्यात महायुतीला या निवडणुकीत चांगलाच फटका बसला होता. महाविकास आघाडीने चारीमुंड्या चीत केल्याने दिग्गज नेते, माजी मंत्र्यांना घरी बसावे लागले. मराठवाड्यात तर आठ पैकी केवळ छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता सातही मतदारसंघात महाविकास आघाडीने विजय मिळवला. छत्रपती संभाजीनगरची एकमेव जागा शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी जिंकली.
महायुतीच्या मराठवाड्यातील एकमेव खासदार असलेल्या भुमरे (Sandipan Bhumre) यांना अद्याप आपल्या कामाची मात्र छाप पाडता आलेली नाही, अशी चर्चा जिल्ह्यात होत आहे. भाजपने लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर जागेवर दावा सांगितला होता. त्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्नही केले, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा शिवसेनेचीच असल्याचा दावा करत आपल्याकडे राखली. विशेष म्हणजे या एका जागेवरील विजयानेच महायुतीची मराठवाड्यात लाज राखली गेली होती. संदीपान भुमरे यांनी एमआयएम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना पराभूत करत ही जागा खेचून आणली होती.
मराठवाड्यात महायुतीचे रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे या बड्या नेत्यांसोबतच प्रताप पाटील चिखलीकर, महादेव जानकर, अर्चना पाटील, सुधाकर शृंगारे, बाबुराव कदम हे पराभूत झाले होते. संभाजीनगरमध्ये मात्र संदीपान भुमरे यांनी लाखाहून अधिक मताधिक्याने विजय मिळवला. (Shivsena) या विजयाची चर्चा राज्यभरात झाली,पण गेल्या दहा महिन्यात भुमरे मतदारसंघात आपली छाप पाडू शकले नाहीत. जालना लोकसभा मतदारसंघातील पैठण विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार आणि राज्याच्या सरकारमध्ये दोन वेळा कॅबिनेट मंत्री राहिलेल्या भुमरेंचे मन दिल्लीत फारसे रमत नाही असेच दिसते.
संदीपान भुमरे हे छत्रपती संभाजीनगरचे खासदार असले तरी त्यांचा जीव अजूनही पैठण विधानसभा मतदारसंघातच अडकल्याचे चित्र आहे. अजूनही जिल्ह्याचे खासदार म्हणून संदीपान भुमरे यांचे ठोस असे काम मतदारांना दिसले नाही. सत्कार, समारंभ, स्वागत आणि हारतुरे यातून आता त्यांनी बाहेर पडले पाहिजे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत, त्यावर लोकसभेत आवाज उठवरा पाहिजे, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करताना दिसत आहेत.
तुलना तर होणारच..
गेली पाच वर्ष छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी दिल्लीत केले होते. मतदारसंघाशिवाय राज्य आणि देश पातळीवरील विविध प्रश्नांवर त्यांनी सातत्याने सभागृहात आवाज उठवला आणि लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. अर्थात संदीपान भुमरे यांची खासदार म्हणून सुरुवात असली तरी दहा महिन्यात ते आपला फारसा प्रभाव दाखवू शकलेले नाहीत. राज्यात महायुती आणि केंद्रात एनडीएचे सरकार असल्यामुळे भुमरे सत्ताधारी पक्षाचे खासदार म्हणून त्यांना झुकते माप मिळू शकते.
शिवाय मराठवाड्यातील महायुतीचे एकमेव खासदार म्हणून ते हक्काने मतदारसंघासाठी नव्या योजना, प्रकल्प, उद्योग आणि त्यासाठी लागणारा निधी आणण्यासाठी आग्रह धरू शकतात. येत्या चार वर्षात भुमरे तसा आग्रह धरताना दिसतील अशी अपेक्षा त्यांना निवडून देणाऱ्या मतदारांची निश्चितच असणार आहे. पैठण ही भुमरे यांची कर्मभूमि राहिली आहे. त्याकडे त्यांचे कायम लक्ष राहणारच, पण ज्या संभाजीनगरच्या मतदारांनी त्यांना निवडून देत लोकसभेत पाठवले, त्यांचे प्रश्न सभागृहात मांडून सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात ते प्रयत्न करतांना दिसतील ही अपेक्षा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.