
Sandipan Bhumre Land Scam : छत्रपती संभाजी नगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर जालना रोड येथील सालारजंग, हैदराबाद इथली तब्बल १५० कोटी रुपयांची अंदाजे ९ एकर जमीन हैदराबादमधील नवाबाच्या वंशजानं केल्याचं प्रकरण नुकतंच समोर आलं होतं. पण हा बोगस नवाब असून या जमीन व्यवहारात मोठा घोटाळा असल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनी केला आहे.
बोगस नवाब बनवून भुमरेंच्या ड्रायव्हरच्या नावावर करोडोंची जमीन हिबानामा करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप जलील यांनी केला आहे. तसंच यातून सरकारचा महसूल बुडवण्यात आला असून सरकारची फसवणूक करण्यात आली आहे, असा दावाही त्यांनी केला. त्याचबरोबर याची कागदपत्रेही त्यांनी सादर केली आहेत.
बोगस नवाबाला हाताशी धरून खासदार संदिपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर अडीच एकर नाहीतर कोट्यवधींची साडेआठ एकर जमीन हिबानामा करून घेतली आहे. पाचशे रुपयांच्या बॉण्डवर हिबानामा करून सिटी सर्व्हे कार्यालयात पीआर कार्ड करताना अधिकाऱ्यांना हाताशी धरण्यात आलं आहे. रातोरात या जमिनी ड्रायव्हर जावेदच्या नावावर करून घेतल्या. इतकंच नाही तर या जमिनीची रजिस्ट्री न करता हा व्यवहार झाल्यानं सरकारचं ६ कोटी १८ लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. प्रक्रियेमध्ये सरकारी अधिकारी, मोठे नेते आणि पोलिसांचा सहभाग आहे, असा आरोप माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी जलील यांनी केली आहे.
इम्तियाज जलील यांच्या आरोपांनुसार, खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हरच्या नावावर साडेआठ एकर जागा हिबानामा करुन घेण्यात आली आहे. ४ लाख ३३ हजार ३२५ चौरस फुटांची अर्थात अंदाजे ८ एकर इतकी जमीन आहे. सध्या इथं ३६ हजार १९० रुपये रेडी रेकनरचा दर आहे. त्यानुसार, या संपूर्ण जमिनीची किंमत १२३ कोटी रुपये इतकी सरकारी दरानुसार होते. सध्या या जमिनीचं बाजारातील मूल्य हे पाचशे कोटींपेक्षा जास्त आहे.
यामध्ये हिबानामा अर्थात दान करत असल्याचं लिहून देणारा कथित नवाबाचा वारस हा बोगस व्यक्ती आहे. हिबानामाच्या नावाखाली पाचशे रुपयांच्या बाँडवर हा जमिनीचा व्यवहार करून घेण्यात आला आहे. या हिबानानावर सहा कथित वारसदारांनी सह्या दिल्या आहेत, त्यांचे फोटोही खोटे असल्याचा संशय आहे. यामध्ये दोन साक्षीदार आहेत. यांपैकी रवींद्र बाळासाहेब तोगे यांनी बॉण्ड घेतला आहे. हा व्यक्ती आमदार विलास संदिपान भुमरे यांच्या जवळचा आहे.
या एकूण जमिनीपैकी अडीच एकर जमीनीची २०२३ मध्ये रजिस्ट्री करण्यात आली. यानंतर नमुना नंबर म्हणजे कुणाचे आक्षेप असतील तर ते नोंदवण्यासाठी सिटी सर्व्हे ऑफिसद्वारे नोटीस काढली जाते. दरम्यान, २६ जून २०२४ नंतर एका जमिनीची रजिस्ट्री झाली आहे. त्यानंतर सिटी सर्व्हे ऑफिस सर्व्हेअअरनी १० वाजून ५४ मिनिटांनी नोटीस काढली, ही नोटीस ऑनलाईन अपलोड केली, त्यानंतर लगेच डाऊनलोडही करण्यात आली.
म्हणजेच ही नोटीस २५ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजून ४२ मिनिटाला अपलोड केली आणि काही सेकंदात ती डाऊनलोड केली. तसंच रातोरात पीआर कार्ड दिले, त्यासाठी एका मोठ्या मंत्र्याने फोन करण्यासाठी अधिकाऱ्याला फोन केला. म्हणजे केवळ चार सेकंदात ६ एकर जागेचा व्यवहार झाला. यातून ६ कोटी १८ लाख रुपयांचं सरकारचं नुकसान झालं आहे. हे पैसे रजिस्ट्रीमधून सरकारला मिळायला पाहिजे होते पण मिळालेले नाहीत, असा तपशील इम्तियाज जलील यांनी कागदपत्रांद्वारे दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.