
Nagpur Politics: नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलचा प्रारूप आराखडा सादर होताच नागपूर जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले आहे. ही निवडणूक लढून अनेक युवा नेते जिल्हा परिषदेच्या राजकारणात येण्याची तयारी करीत आहेत. काही युवा नेते वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून जिल्हा परिषदेत एन्ट्री करणार आहेत. या सर्वांनी लढण्याची तयारी देखील सुरू केली आहे.
बंडोपंत उमरकर हे नागपूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते. अनेक वर्षे त्यांनी जिल्हा परिषद गाजवली. त्यांचे अकाली निधन झाले आहे. त्यांचे चिरंजीव मयूर उमरकर आधीपासूनच राजकारण सक्रिय आहेत. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले मयूर यांनी नरखेड पंचायत समिती गाजवली आहे. आता जलालखेडा सर्कलमधून ते जिल्हा परिषदेच्या राजकारण प्रवेश करणार आहेत.
पुरुषोत्तम शहाणे यांची जिल्हा परिषदेचे मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख होती. दोन वेळा निवडून आलेले शहाणे शिक्षण सभापती होते. आता त्यांची जागा त्यांचे चिरंजीव अनिकेत शहाणे घेणार आहेत. ते कामठी विधानसभा मतदारसंघातील बडोदा भूगाव या सर्कलमधून लढण्याच्या तयारित आहेत. ते कामठी बाजार समितीचे सभापती आणि टेमसना ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत.
उमरेड विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या भिवापूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तास सर्कलमधून युवक काँग्रेसचे रणजित बोराडे हे निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. त्यांचे वडील सुरेश बोराडे हे यापूर्वी जिल्हा परिषदेचे सदस्य आणि कृषी सभापती होते. ते पूर्वीपासून युवक काँग्रेसच्या माध्यमातून आपल्या क्षेत्रात चांगलेच सक्रिय आहेत. ग्राम पंचायत निवडणुकीत त्यांनी प्रथमच संपूर्ण १३ जणांचे पॅनेल निवडून आणून आपले नेतृत्व सिद्ध केले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि चंद्रशेखर बाबनकुळे यांच्या विरोधात कामठी विधानसभा मतदारसंघात लढलेले सुरेश भोयर यांचे चिरंजीव अनुराग भोयर हेसुद्धा युवक काँग्रेसचे महासचिव आहेत. त्यांचे येरखेडा सर्कल नव्या रचनेत तुटले आहे. येरखेडा येथे नगर पालिका झाली आहे. त्यामुळे अनुराग यांनी जिल्हा परिषद स्वतः लढण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचे ठरवले आहे.
जिल्हा परिषदेच्या राजकारणातून उमरेड विधानसभा मतदारसंघातून दोन वेळा आमदार झालेले सुधीर पारवे यांचे चिरंजीव रोहित पारवे भाजप युवा मोर्चा कार्यकारी अध्यक्ष आहेत. ते चांगलेच सक्रिय आहेत. कारगाव तास आणि भगवानपूर या दोन सर्कलचा पर्याय त्यांच्यासमोर आहेत. आरक्षणाच्या सोडतीनंतर नेमके कुठून लढायचे याचा निर्णय आपण घेऊ असे रोहित यांचे म्हणणे आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.