Beed Political News : मुंडेंचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेल्या माजी मंत्री पंडितराव दौंड व माजी आमदार संजय दौंड यांनी शरद पवारांच्या शब्दाखातर 2019 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संजय दौंड परळीतून धनंजय मुंडे यांच्या विरोधात रणांगणात उतरण्यासाठी चाचपणी करत आहेत.
पूर्वीचा रेणापूर व आताच्या परळी विधानसभा मतदारसंघात दौंड यांची स्वतंत्र फळी व राजकीय ओळख आहे. 1985 सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून लढलेल्या पंडितराव दौंड यांनी भाजपच्या दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा पराभव केला होता. पंडितराव दौंड यांना मंत्रीपदही भेटले. तेव्हापासून परळी मतदारसंघात दौंड व मुंडे एकमेकांचे कट्टर विरोधक अशी परळी मतदारसंघात ओळख आहे.
दरम्यान, मागच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांनी (Sharad Pawar) धनंजय मुंडे यांच्यासाठी परळीची एकमेव काँग्रेसची जागा राष्ट्रवादीला सोडवून घेतली. पवारांनी धनंजय मुंडे व दौंड पिता - पुत्रांना एकत्र बसवत या दोघांना मुंडेंच्या प्रचारातही सक्रीय केले. कायम काँग्रेसी व मुंडे विरोधक अशी प्रतिमा ठेवण्यात यशस्वी झालेल्या पंडितराव दौंड व संजय दौंड यांनी धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी जिवाचे रान केले. धनंजय मुंडे यांच्या विजयानंतर संजय दौंड यांना धनंजय मुंडेंचा विधान परिषदेचा कार्यकाळ संजय दौंड यांना मिळाला.
मात्र, काँग्रेसमध्ये असलेल्या संजय दौंड यांना विधान परिषद राष्ट्रवादीच्या कोट्यातून देण्यात आली. त्यामुळे ते काँग्रेसपासूनही दुर गेले. दरम्यान आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. परळीतून धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या विरोधात उमेदवारी मिळवण्यासाठी राष्ट्रवादीकडून बबन गिते, सुदामती गुट्टे, राजाभाऊ फड, अॅड. माधव यांच्यासह काँग्रेसचे राजेसाहेब देशमुख प्रयत्नाशील आहेत.
परवाच राजेसाहेब देशमुख यांनी पवारांची भेटही घेतली. मात्र, याच दरम्यान संजय दौंड (Sanjay Dound) देखील धनंजय मुंडे यांच्या विरोधात रिंगणात उतरण्यासाठी समर्थकांकडे चाचपणी करत आहेत. सुरुवातीचे साडेचार वर्षे कायम मुंडेंसोबत बहुतांश कार्यक्रमाला दिसणारे संजय दौंड मागच्या काही दिवसांत परळीतील मुंडेंच्या कार्यक्रमापासून दुर आहेत. परळीतील बहुचर्चित राज्यस्तरीय कृषी महोत्सव तसेच नाथ प्रतिष्ठानच्या कार्यक्रमापासूनही दौंड दुर होते. त्यामुळे दौंड देखील मुंडेंच्या विरोधात इच्छुक असल्याला पुष्टी मिळत आहे. ‘आपण धनंजय मुंडेंच्या विरोधात लढलो तर काय, अशी विचारणा ते समर्थकांना करत आहेत. आता शरद पवार त्यांच्याबाबत काय भूमिका घेणार हे पाहावे लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.