Chhatrapati Sambhajinagar : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यासाठी हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. यावेळी केलेल्या भाषणात आदित्य ठाकरे यांनी पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका केली. 72 व्या मजल्यावर राहणाऱ्यांना पाणी प्रश्न काय कळणार? असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिरसाट यांच्यावर निशाणा साधला. त्यावर आदित्य ठाकरे यांचा कालचा हल्लाबोल मोर्चा म्हणजे काही मिनिटांचा इव्हिनंग वाॅक होता, अशा शब्दात शिरसाट यांनी खिल्ली उडवली.
काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड मारू नयेत, आमच्या कुठेही बोगस फॅक्टरी नाहीत, अवाढव्य संपती नाही, असा टोलाही शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला. छत्रपती संभाजीनगर येथील पाणी प्रश्नावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरू केलेल्या जनआंदोलनाचा समारोप काल आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत काढण्यात आलेल्या हल्लाबोल मोर्चाने झाला. मोर्चाचे रुपांतर सभेत झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे आणि पालकमंत्री संजय शिरसाट यांना टोले लगावले.
संजय शिरसाट यांच्या मुंबईतील 72 व्या मजल्यावरील फ्लॅटचा उल्लेख करत त्यांना पाणी प्रश्न काय कळणार? खासदारांना पाणी मागितले तर ते बाटलीत काय देतील? असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे यांनी भुमरे-शिरसाट यांना डिवचले. त्यावर संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना इशारा दिला. काल आदित्य ठाकरेंनी इथे केलेल्या इव्हिनींग वॉक नंतर भाषणात पंचवीस वेळा देवेंद्र फडणवीस साहेब... असे तुणतुणे वाजवले. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये.
आमच्या कुठेही 48 बोगस फॅक्टरी नाहीत. खोट्या फॅक्टऱ्या निर्माण करून आमच्याकडे कुठेही गडगंज संपत्ती नाही. याची सुद्धा चौकशी चालू आहे, हे त्यांनाही माहीत आहे. जो खुद काच के घर मे रहते है, वो दुसरो के घरोपर पत्थर नही मारा करते, असा सूचक इशारा शिरसाट यांनी दिला. आदित्य ठाकरे, संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत त्यांनी पलटवार केला.
आदित्य ठाकरे नेहमीच्या स्टाईलमध्ये आला, इव्हिनिंग वॉक केला. सर्व परिस्थितीची जाणीव असल्याने भाषणात फडणवीस साहेब असा २५ वेळा उल्लेख केला अन् निघून गेला. गेल्या दोन दिवसापासून संजय राऊत यांच्या जेलमध्ये लिहिलेल्या पुस्तकासंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहे. त्यात काही तथ्य नाही. खोटं बोल पण, रेटून बोलायची त्यांची मानसिकता आहे. त्याला खोटे बोलण्याचा पुरस्कार दिला पाहीजे. ते उठावापासून आजपर्यंत एकही वाक्य खरे बोलले नाही. खोटारड्या माणसातील ते हिरो आहेत, ते महाशय जामिनावर बाहेर आहेत. हिरो बनवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे, त्यांची चौकशी सुरू आहे. ते कधीही आतमध्ये जावू शकतात. योग्यवेळी योग्य कारवाई राऊत यांच्यावर होईल, असा सूचक इशाराही शिरसाट यांनी केला.
चोऱ्या-माऱ्या वाढल्या..
पोलीसांना दहा दिवसांपूर्वी बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करा. शहरातील दरोडे, चोरीच्या घटना वाढल्याच्या पार्श्वभूमिवर पोलीसांची पुन्हा एक बैठक घेऊन त्यांना या सर्व प्रकारावर आळा घालण्यासाठी सूचना देऊ, असे शिरसाट म्हणाले. येत्या अधिवेशनात माझ्या खात्यातर्फे पुरवणी मागण्या केल्या जातील. त्यातून सामाजिक न्याय विभागाला निधी मिळेल. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. महाविकास आघाडीत फाटाफूट होणार आहे. राष्ट्रवादी, काँग्रेसमधील आमदार, पदाधिकारी यायला तयार आहेत. उबाठा गटात पुन्हा कधी फूट पडेल याची शाश्वती नाही, असा दावाही शिरसाट यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.