पालकमंत्री संजय शिरसाट यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून उपोषण सोडवले, ज्यावरून त्यांच्यावर टीका झाली.
टीकेला उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “यात चूक काय? मी माणूस म्हणून वागलो, असंवेदनशीलतेचा प्रश्नच नाही.”
या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर आणि राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
Shivsena News : नऊ दिवसापासून कन्नड येथे बेमुदत उपोषणाला बसलेल्या आंदोलकाला आपल्या घरी बोलावून त्याचे उपोषण सोडवल्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट वादात सापडले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी या मागणीसाठी एक तरुण शेतकरी अन्नाशिवाय बेमुदत उपोषणाला बसला होता. त्याची प्रकृती बिघडलेली असताना संजय शिरसाट यांनी भेटायला जाण्याऐवजी चक्क उपोषणकर्त्यालाच अॅम्ब्युलन्समध्ये आपल्या घरी बोलावून घेतले.
संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांची ही कृती असंवेदनशील असल्याची टीका त्यांच्यावर चोहोबाजूंनी होत असताना ते मात्र आपल्या कृतीवर ठाम आहेत. या प्रकारावरून उठलेल्या गदारोळावर प्रतिक्रिया देतांना संजय शिरसाट यांनी आपल्याला कुठलीही खंत नाही, आपण चूक केलेली नाही, असंवेदनशीलतेचा तर प्रश्नच उद्भवत नाही, असे म्हणत आपल्याला या कृतीचा पश्चात नसल्याचे ठामपणे सांगितले.
एका वाक्यावरून विपर्यास करायचा, दिशाभूल करायची हे योग्य नाही. उपोषणकर्त्याने इच्छा व्यक्त केली म्हणून मी त्यांना माझ्या घरी बोलावले. त्यांच्याशी संवाद साधला आणि मग हे उपोषण सोडवले, असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही काय करतो? आमच्या मनात त्यांच्याबद्दल किती आदर आहे हे तुम्हाला कळणार नाही. अतिवृष्टीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना (Farmers) आम्ही मदतीचा हात दिला, विरोधकांनी केवळ टीका केली. त्यांना आम्ही महत्व देत नाही.
नऊ दिवसापासून उपोषणावर असलेल्या या शेतकऱ्याकडे आमचे लक्ष होते. त्याला शहरात आणणे, चांगले उपचार देणे गरजेचे होते. त्यांच्या कुटुंबियासह त्याने मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. मी मुंबईहून रात्री आलो, वेळ वाचावा म्हणून उपोषणकर्त्यालाच माझ्या घरी बोलावून घेतले. यात चुकीचे काय? यात कसली आली असंवेदनशीलता? खंत वाटण्यासारखं यात काय आहे? असा सवाल संजय शिरसाट यांनीच केला.
नेमकं प्रकरण काय?
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीबाबत शासनाकडून ठोस मदत मिळावी, तसेच तत्काळ सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, या मागणीसाठी कन्नड तहसील कार्यालयासमोर 10 ऑक्टोबरपासून संदीप विजयकुमार सेठी यांनी बेमुदत उपोषण सुरू केलं होतं. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंजाब सरकारप्रमाणे सरसकट नुकसानभरपाई द्यावी, पूरग्रस्त मृतांच्या कुटुंबियांना तातडीची मदत करावी, सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, सरसकट कर्जमाफी जाहीर करून नवीन कर्ज मंजूर करावे, बँक वसूली वर्षभरासाठी स्थगित करावी इत्यादी मागण्या त्यांनी सरकारकडे केल्या.
दरम्यान, तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांनी उपोषणकर्ते संदीप सेठींना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. परंतू त्यांनी पालकमंत्री संजय शिरसाट उपोषणस्थळी येऊन आश्वासन देणार नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा निर्धार केला होता. त्यांच्या या निर्णयामुळे प्रशासनाची कोंडी झाली. त्यानंतर दिवाळीच्या सुट्ट्या असल्यामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचारी सुट्टीवर असतील, त्यामुळे उपोषण मागे घ्या, असा आग्रह काही अधिकाऱ्यांनी केल्यानंतर तहसीलदार विद्याचरण कडवकर आणि शिवसेनेचे उपसंघटक शिवाजी थेटेंनी पालकमंत्री शिरसाटांसोबत संपर्क साधला.
मात्र, यावेळी पालकमंत्र्यांनी बिझी शेड्युल असल्यामुळे कन्नडला येणे शक्य नसल्याचं सांगितलं. एवढंच नव्हे तर त्यांनी थेट उपोषणकर्त्यांनाच पालकमंत्र्यांच्या घरी आणा, इथे उपोषण सोडवू, असा निरोप दिला. त्यामुळे अखेर उपोषणकर्त्याला उपोषणाच्या नवव्या दिवशी थेट छत्रपती संभाजीनगर शहरातील संजय शिरसाट यांच्या घरी आणलं. त्यानंतर शिरसाट यांनी उपोषणकर्त्याला ज्युस पाजून उपोषण सोडलं. मात्र, पालकमंत्री म्हणून शिरसाट यांनी स्वत: उपोषण स्थळी जायला पाहिजे होतं, त्यांनी केलेली कृती अयोग्य असल्याची टीका अनेकांकडून केली जात आहे. शिवाय या कृतीमुळे पालकमंत्र्यांनी असंवेदनशीलतेचा कळस गाठल्याचं लोक म्हणत आहेत.
1. संजय शिरसाट यांनी काय केलं?
त्यांनी उपोषणकर्त्या शेतकऱ्याला घरी बोलावून संवाद साधला आणि उपोषण सोडवले.
2. या कृतीवर टीका का झाली?
काही विरोधकांनी हे असंवेदनशील वर्तन असल्याचा आरोप केला.
3. शिरसाट यांनी काय स्पष्टीकरण दिलं?
त्यांनी सांगितले की त्यांनी मानवी दृष्टिकोनातून वागले आणि शेतकऱ्याला सन्मान दिला.
4. उपोषणकर्त्या शेतकऱ्याची मागणी काय होती?
शेतकरी स्थानिक पातळीवरील शेतीविषयक समस्या आणि मदतीसाठी उपोषण करत होता.
5. या प्रकरणावर पुढील काय घडू शकतं?
पक्षीय आणि विरोधी नेत्यांकडून या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.