Shivsena News: राज्याच्या राजकारणात सध्या महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध शिंदे-फडणवीस सरकार असा कलगितुरा रंगला आहे. विशेषतः राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाचा आलेला निकाल आणि कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा झालेला पराभव यानंतर या कलगितुऱ्याला अधिकच धार आल्याचे पहायला मिळत आहे. ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदेंचे सरकार हे केंद्रातील मोदी सरकारचे पायपुसणे झाले आहे, अशी टीका केली होती.
त्याला आता शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्यातील शिंदे सरकार हे केंद्राकडून कोट्यावधींचा निधी आणून राज्याला विकासाच्या दिशेने वेगाने घेवून जात आहे. अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये यांना काही करता आले नाही, आता आम्ही करतोय तर त्यांची पोटदुखी वाढली आहे. त्यामुळे आम्ही केंद्राचे पायपुसणे नाही, तर संजय राऊत (Sanjay Raut) हे शरद पवारांचे पायपुसणे झाले आहे, असा टोला शिरसाट यांनी लगावला.
संजय राऊत यांच्या बेताल वक्तव्यांमुळे भविष्यात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंचा गट भिंगाने शोधावा लागेल, असा चिमटा देखील शिरसाट यांनी काढला. (Maharashtra) शिरसाट म्हणाले, संजय राऊत हे विधानसभा अध्यक्षांवर बेछूट आरोप करत आहेत, या संदर्भात मी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेवून संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्या संदर्भात चर्चा करणार आहे.
विधानसभा अध्यक्ष हा कुठल्या पक्षाचा नसतो. त्यांना न्यायिक अधिकार प्राप्त झालेले आहे, अशा व्यक्तीवर दबाव आणण्याचा प्रयत्न संजय राऊत, महाविकास आघाडी सरकार करत असेल तर याचा कुठे तरी गांभीर्याने विचार करावा लागेल. या संदर्भात आम्ही कायदेशीर सल्ला देखील घेत आहोत, असेही शिरसाट यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडी सरकारमध्ये लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची बोलणी झाली असल्याकडे शिरसाटांचे लक्ष वेधले असता, महाविकास आघाडी टिकणार नाही, या आघाडीचा पोपट मेला आहे. काही दिवसांनी संजय राऊत हे तुम्हाला शरद पवारांच्या मांडीवर जावून बसलेले दिसतील. महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरे गटाला सहन करणार नाही, राऊत यांच्या वक्तव्यांमुळे उद्धव गटाचे मोठे नुकसान होत आहे, असेही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.