Shivsena News : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर काही दिवसापुर्वी एमआयएमने गंभीर आरोप केले. त्यात जवळच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उद्योजकांसाठी असलेल्या सात कोटीच्या योजनेचा लाभ दिला जात असल्याचे म्हटले होते. याकडे फारसे लक्ष न देता आता संजय शिरसाट यांनी मोठं काहीतरी करा, पाच-सात कोटी काय मागता? सत्तर-ऐंशी कोटीचा निधी देतो. उद्योग उभे करा, उद्योजक निर्माण करा, असे आवाहन त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले.
उद्योगासाठी घेतलेल्या कर्जातून मुलासाठी गाडी, पत्नीला सोन्याच्या बांगड्या करून मौज करणाऱ्यांनाही संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी चांगलेच सुनावले. उद्योगासाठी घेतलेले कर्ज तो उभारण्यासाठीच वापरला पाहिजे. पण पहिला हप्ता मिळताच त्यातून गाडी, सोने खरेदी केल्यामुळे पुढचा हप्ता मिळायला अडचणी निर्माण होतात, असेही शिरसाट म्हणाले. बुद्धिस्ट इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स ॲण्ड ट्रेडर्स असोसिएशनचा शपथविधी सोहळ्यात त्यांनी तरुणांना सल्ला देतानाच काहीजणांचे कानही टोचले.
काहीजण उद्योग-व्यवसायासाठी कर्ज घेतात, पण त्याचा सदुपयोग करण्याऐवजी कर्जाचा पहिला हप्ता आला, की स्वतःला फोर व्हिलर, मुलासाठी गाडी आणि पत्नीसाठी सोन्याच्या बांगड्या घेतात! नंतर दुसरा हप्ता मिळण्यात अडचणी येतात. जोपर्यंत इतर समाजाचा आपल्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत समाजाचा अपेक्षित विकास होणार नाही. (Shivsena) आजपर्यंत राज्यातील जनतेला समाजकल्याण खाते काय होते, हे फारसे माहीत नव्हते. मी आल्यानंतर समाजाला कळले, की या खात्याला खूप मोठे बजेट असते.
माझ्या खात्याचे बजेट हे 29 हजार कोटी एवढे आहे. पण समाजातील तरुण मागतो किती? तर तीन कोटी, सात कोटी. त्यातला पहिला हप्ता आल्यानंतर स्वतःला फोर व्हीलर, मुलाला गाडी, बायकोच्या हातात सोन्याच्या बांगड्या करतो. सहा महिने मौज मस्ती केल्यानंतर पहिल्या हप्त्याचे पैसे संपतात आणि मग दुसऱ्या हप्त्यासाठी समाजकल्याण कार्यालयात चकरा मारतात. तेव्हा अधिकारी मागील हप्त्यात दिलेल्या पैशातून किती स्टार्टअप उभा राहिले, याची पाहणी करतात.
तेव्हा त्याने काहीच केलेले नसते. त्यामुळे दुसरा हप्ता काही मिळत नाही. एखादा उद्योग उभा करण्यासाठी एक कोटी, तीन कोटी रक्कम पुष्कळ झाली. मात्र, आपले लोक उद्योग उभा करत नाहीत. जेव्हा समाजकल्याण खात्याला अधिक बजेट मिळावे, अशी मागणी मी करतो, तेव्हा तुमचे लोक व्यवसाय उभा करत नाहीत, कर्जाचे हप्ते भरत नाहीत असे उत्तर मिळते! त्यामुळे जोपर्यंत इतर समाजाचा आपल्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत नाही, तोपर्यंत समाजाचा अपेक्षित विकास होणार नाही. त्यासाठी आपणही प्रयत्न करावेत, असे आवाहन संजय शिरसाट यांनी यावेळी केले.
माझ्याकडे समाजातील तरुण तीन कोटी, सात कोटींची फाइल तयार करून घेऊन येतात आणि ती मंजूर करा, म्हणून आग्रह धरतात. अरे बाबांनो! समाजकल्याण खात्याला खूप मोठे बजेट आहे. त्यामुळे तीन कोटी, सात कोटी काय मागता? आपण 11 जणांची संस्था रजिस्ट्रेशन करा. जीनिंगसारख्या कंपन्या उभ्या करा, त्याकरिता 70-80 कोटी रुपये निधी द्यायला मी तयार आहे. त्यामुळे मोठे काही तरी करा. तुम्ही उद्योजक बना आणि तुमच्या सोबत 100 नवीन उद्योजक तयार करा, ते 1 हजार उद्योजक तयार करतील, अशा प्रकारे एकमेकाला हात देऊन समाजाला पुढे आणा, देणारे हात व्हा, असेही शिरसाट म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.