
Beed News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण बीड जिल्हा हादरला होता. या हत्येनंतर बीडमधील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतानाच पोलीस दलावरही गंभीर आरोप करण्यात आले होते. यानंतर सातत्यानं बीडमधील फोफावलेल्या गुन्हेगारीच्या अनेक घटना चव्हाट्यावर आल्या होत्या. अशातच बीड पोलिस (Beed Police) दलातून एक मोठी अपडेट समोर आली आहे.
बीड घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनी गुंडाच्या टोळ्यांना कडक इशारा देताना कोणालाही सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. याचदरम्यान,बीड पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहे. तब्बल एकाचवेळी 600 हून अधिक पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्हा पोलीस (Police) दलात गुरुवारी (ता.22) मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा दणका दिला आहे.
केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणानंतर बीड पोलिसांवर सातत्यानं आरोप केले जात आहे. थेट पोलिस यंत्रणांनाच आरोपीच्या पिंजर्यात उभे केले गेल्यामुळे बीड पोलिस अधिक्षक नवनीत काँवत हे गेल्या काही महिन्यांपासून धडाकेबाज निर्णय घेत आहेत. आता त्यांनी जिल्ह्यातील तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या करत गुन्हेगारांना मोठा इशाराच दिल्याचं बोललं जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही गंभीर आरोप करण्यात आले होते. तसेच याप्रकरणाशी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची मागणीही करण्यात आली होती. याच सगळ्या घडामोडींनंतर आता बीड पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा एकूण 600 हून अधिक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
बीड जिल्ह्यात दिवसाढवळ्या होणारे अपहरण, दरोडे, खून, अत्याचार, शस्त्रांनी दहशत, मारहाणीच्या घटनांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी यावरुन सातत्यानं आवाज उठवत थेट मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवारांनाही लक्ष्य केलं होतं.
बीड पोलीस दलात एकाचवेळी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या अर्थात तब्बल 600 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आल्यामुळे पोलिस अधिक्षक नवनीत काँवत यांच्या धाडसी निर्णयाचं कौतुक केले जात आहे. यामुळे फोफावलेल्या बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या विषयावरून पोलीस यंत्रणावर होत असलेले आरोप थांबण्याची शक्यता आहे.
संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी गेल्या काही वर्षांपासून याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी जवळचे संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांवर कारवाई सोडाच त्यांना बळ देण्याचं कामही काही प्रकरणात पोलिसांकडून झाल्याची बाब समोर आली होती. या बदल्यानंतर अधिक्षक काँवत यांनी एकाच ठिकाणी वर्षानुवर्षे कार्यरत राहिल्यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची हिंमत बळावली असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि बीडचे पालकमंत्री अजित पवार हे 2 एप्रिल रोजी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी जाहीर भाषणातून बीडमधील अधिकाऱ्यांना दम भरला होता. तसेच त्यांनी यावेळी बीडमधील काही अधिकारी बदलावे लागतील, असे संकेतही दिले होते. अजित पवारांनी आपल्या भाषणात कार्यकर्त्यांचे देखील कान टोचत दादागिरी करणाऱ्यांना माफ करणार नाही असा दम भरला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.