
Nagpur News : महायुती सरकारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे.धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर कुणाच्या मनीध्यानी नसताना अचानकपणे छगन भुजबळांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. यानंतर धनंजय मुंडे नाराज असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत. त्यांनी भुजबळांनी शपथ घेतल्यानंतर त्याचदिवशी रात्री उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचीही माहिती समोर येत आहे.अशातच आता एकनाथ शिंदेंच्या मंत्र्यांवर आता भाजप आमदारानं गंभीर आरोप केल्यानं खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या अडचणी वाढण्याची दाट शक्यता आहे.कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणाऱ्या भाजप आमदार संदीप जोशी यांनी मंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राठोड यांच्या खात्यात पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचा गंभीर स्वरुपाचा आरोप केला आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे महायुतीतील मित्रपक्षाच्या एका आमदारानं थेट सरकारमधील मंत्र्यांवर आरोप केल्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. संदीप जोशी यांनी याबाबतचं एक पत्रही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना लिहिलं आहे.यामुळे राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र सरकारच्या मृद व जलसंधारण विभागात अधिकाऱ्यांची पैसे घेऊन नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप करत संदीप जोशी यांनी विदर्भासह महाराष्ट्राचंही राजकारण तापवलं आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यावेळी त्यांनी तब्बल आठ अधिकाऱ्यांची बेकायदेशीर नेमणूक करण्यात आल्याचा ठपका ठेवला आहे.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार संदीप जोशी यांनी यावेळी उपविभाग जलसंधारणाच्या तब्बल 375 अधिकाऱ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोपही केला आहे. अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी पैशांचा व्यवहार 100 टक्के झाला ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचंही म्हटलं आहे.
तसेच याप्रकरणी कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. भाजप आमदार संदीप जोशी म्हणाले,ज्यावेळी जेव्हा शासकीय निर्णय स्पष्ट असतात तेव्हा कुठलातरी मार्ग काढून स्वत:च्या बदल्या करण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडत असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
टिकटॉक स्टार पूजा चव्हाणच्या मृत्यूनंतर महाविकास आघाडी सरकारमधील तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अखेर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा सोपवला होता. बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या 23 वर्षीय पूजा चव्हाणच्या मृत्यूमध्ये संजय राठोड यांच्यावर सहभाग असल्याचा आरोप झाला होता.पण नंतर पुणे पोलिसांनी त्यांना याप्रकरणी क्लीन चिट दिली होती.
देवेंद्र फडणवीस सरकारकडून बुधवारी (ता.21) आठ आयएएस अधिकार्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. या बदल्यांना 24 तास होत नाही, तोच आता सरकारकडून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरुच आहे. यापूर्वी 13 मे रोजी आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 17 मे रोजी तब्बल 27 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या.आता गृह विभागाने गुरुवारी (22 मे) आणखी 21 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.