
Beed News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. या निर्घृण हत्येचे तीव्र पडसाद फक्त बीडच नव्हे तर संपूर्ण देशपातळीवर उमटले होते. इतके दिवसानंतरही या प्रकरणात नवनवीन सीसीटीव्ही फुटेज याच्यासह रोज नवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहे. तसेच या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा मुख्य आरोपी अजूनही फरारच आहे.याचदरम्यान,आता दिवंगत सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आजपर्यतचा सगळ्यात गंभीर आरोप करत एकच खळबळ उडवून दिली आहे.
बीडच्या सरपंच हत्या प्रकरणानंतर राज्यातलं राजकारण ढवळून निघालं आहे. याप्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करतानाच वाल्मिक कराडसह (Walmik Karad) आठ आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. आता धनंजय देशमुख यांनी संतोष देशमुख हत्या ही अनैतिक संबंधातून दाखवण्यात येणार होती असा दावा करुन मोठी खळबळ उडाली आहे.
धनंजय देशमुख म्हणाले,संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता. देशमुख यांचा मृतदेह त्यावेळी एका महिलेकडे घेऊन जायचा. तिथे छेडछाड झाली,संबंधित महिलेने कपडे फाडून घेतले असते,अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसानं असं केलं म्हणून त्याला समाजातून उठवलं,असा भासवण्याचा त्यांचा प्लॅन होता असा दावा केल्यानं संतोष देशमुख हत्याप्रकरण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.
भाजप आमदार सुरेश धस- आणि धनंजय मुंडेंच्या गुप्त भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरण हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या गुप्त भेटीवरुन आधी अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेवरील विरोधकांचा टीकेचा रोख काहीसा बाजूला गेला आणि धसांच्या भूमिकेवरुन टीकेचा भडिमार करण्यात येत आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनापासून संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरलेल्या भाजप आमदार सुरेश धस यांनी अनेक धक्कादायक खुलासे करत धनंजय मुंडेंविरोधात राजकीय वातावरण तापवलं होतं. त्यांनी जरी मुंडेंच्या राजीनाम्याची प्रत्यक्ष मागणी केली नसली तरी या विरोधकांकडून राजीनाम्यासाठी सरकारवर प्रचंड दबाव निर्माण करण्यात त्यांचाच हात मोठा आहे. मुंडेंसोबतच्या गुप्त भेटीनंतर धस यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जाऊ लागला आहे. त्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं कितीही ओरडून सांगत असले तरी मस्साजोगसह मराठवाड्यात धस हे सध्या बॅकफूटला गेले आहेत.
अशातच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता,असा दावा आमदार सुरेश धसांनी विधिमंडळ अधिवेशनातही केला होता. आता त्यावर धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.देशमुख म्हणाले, या गुन्हेगारी टोळीचा जो मुख्य आहे त्यांचा एका सरपंचाची हत्या झाली आहे.त्याला एका महिलेकडे घेऊन जायचं, असा अगोदर त्यांचा प्लॅन होता.पण त्यांनी मृत्यू झाल्यानंतरही सोडलं नाही.
हे त्या महिलेकडे जाऊन त्या ठिकाणी सोडणार होते.छेडछाड झाली,त्या ठिकाणी कपडे फाडून घेतले असते,अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसाने असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं. चांगल्या माणसाकडून असं दाखवण्याचा त्यांचा प्लॅन जर ठरला तसा घडला असता तर आज सगळ्यांनी निषेध व्यक्त केले असते.कट करणारा मुख्य होता. कट कारस्थानात सहभागी असणारी पोलिसची गाडी,आणि त्यात कोण पोलीस होते ते अद्याप समजू शकलं नाही, असा दावाही धनंजय देशमुख यांनी केला आहे.
धनंजय देशमुख म्हणाले,पोलिसांनी भावाला जिथून घेतलं होतं,ती गाडी चिंचोलीला आली.चिंचोली फाट्याजवळ एक रस्ता केजकडे येतो आणि एक रस्ता कळंबकडे जातो.कळंबच्या दिशेने ती गाडी वळून जात होती. पण गावातल्या एक – दोन गाड्या पोलीसच्या पाठीमागे होत्या, हे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस गाडीचा टर्न घेऊन त्यांना केजच्या रुग्णालयात घेऊन आले असाही खळबळजनक विधान धनंजय देशमुख यांनी केलं आहे.
त्यांचा काय प्लॅन होता, तो साध्य झाला नाही.पण तसं काही दुर्दैवानं झालं नाही,त्यांचे काय प्लान होते यावर डोकं लावणं चुकीचं असून आम्हाला याचा पुन्हा तपास करायचा आहे.त्यांनी सीआयडीला काय तपास दिला आणि आता मला नवीन अधिकार्याकडून काय मिळणार आहे. आम्ही आमच्या स्तरावर ती चौकशी करून घेणार आहोत. बऱ्याचशा गोष्टी ज्या इकडे आल्या नाहीत, त्या येणार आहेत, त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असेही धनंजय देशमुखांनी सांगितले.
धनंजय देशमुखांनी सांगितले की, महिलांनी आरोप करायचे आणि त्यातूनच संतोष देशमुख यांची हत्या झाली होती असं दाखवायचं होतं. पण नशीब त्यातील दोन गाड्या गाडीच्या पाठीमागे होत्या, म्हणून हे त्यांना साध्य करता आलं नाही. आम्हालाही ही गोष्ट रात्री लगेच कळाली. सुरेशअण्णा धस यांनी इथली माहिती घेऊन सभागृहात ती मांडली होती. मात्र, आम्हांला पहिल्या आठ दिवसांची पुन्हा चौकशी करुन या प्रकाराची माहिती घ्यायची आहे. पोलिसांनी सीआयडी आणि एसआयटीला काय माहिती दिली आहे”, असा सवालही धनंजय देशमुख यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.