

Marathwada graduate constituency : अमरावतीसह पुणे व इतर मतदार संघात महायुतीतील बंडखोरी अधिकृत उमेदवारांना डोकेदुखी ठरू पाहत असताना आता युतीतील वाद संपुष्टात आला आहे. अमरावतीत शिवसेनेच्या उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीच्या बंडखोराला पाठिंबा दिला जात असल्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघात आम्ही सतीश चव्हाण यांचा पाठिंबा काढत आहोत, अशी आक्रमक भूमिका शिवसेनेने घेतली होती.
शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून हा निर्णय घेतला असल्याचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी जाहीर केले होते. यावरून महायुतीमध्ये तणाव असताना काल महायुतीच्या समन्वय समितीतील प्रमुख नेत्यांनी अमरावती येथे बंडखोरांना शांत करत अधिकृत उमेदवाराच्या पाठीशीच युतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भक्कमपणे उभे राहावे, अशी भूमिका राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांच्याशी देखील चर्चा झाल्याचे संजय शिरसाठ यांनी सांगितले.
महायुतीतील वाद आता संपला आहे, त्यामुळे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे युतीचे अधिकृत उमेदवार सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना तन-मन-धनाने काम करणार असल्याची ग्वाही संजय शिरसाठ यांनी त्यांच्या निवासस्थानी सतीश चव्हाण यांच्यासोबत घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.
आज मराठवाडा पदवीधर मतदार संघामध्ये महायुतीचे उमेदवार सतीश चव्हाण यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नांदेड आणि बीड येथे सभा होणार आहेत. या घाईतच सतीश चव्हाण यांनी आज सकाळी दहा वाजता शिवसेनेचे नेते पालकमंत्री संजय शिरसाठ यांचे निवासस्थान गाठले.
या ठिकाणी झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत संजय शिरसाठ यांनी महायुतीतील वाद ,मतभेद संपले आहेत. राज्यातील शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या पाचही निवडणुकीत अधिकृत उमेदवारांच्या पाठीशीच उभे राहण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे.
अमरावती पुणे नाशिक या मतदारसंघांमध्ये काही वाद निश्चितच निर्माण झाले होते. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांना विरोधातच बंडखोरांना बळ देण्याची भूमिका काही ठिकाणी मित्र पक्षांनी घेतली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा पदवीधर मतदार संघात सतीश चव्हाण यांना पाठिंबा न देण्याची भूमिका घेतली होती.
महायुतीमध्ये असे प्रसंग अनेकदा येतात परंतु त्यानंतर आम्ही घेतलेल्या भूमिकेला राजकीय दबाव असे म्हणणे चुकीचे ठरते. कारण प्रत्येकाला आपला उमेदवार निवडून यावा यासाठी काही भूमिका घ्यावी लागते, आणि त्याच पद्धतीने आम्ही ती मराठवाडा विधानसभा मतदारसंघात सतीश चव्हाण यांच्या बाबतीत घेतली होती.
परंतु या निवडणुकीसाठी महायुतीने तयार केलेल्या समन्वय समितीतील नेत्यांनी तसेच राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी पाचही विधान परिषदेच्या जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी आपापसातील मतभेद बाजूला ठेवून अधिकृत उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा निर्णय झाला आहे, असे शिरसाठ यांनी सांगितले.
अमरावतीमध्ये युतीचे पदाधिकारी शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचे काम करणार असल्यामुळे, सतीश चव्हाण यांच्या बाबतीत दोन दिवसांपूर्वी जाहीर केलेली भूमिका शिवसेनेने बदलली आहे. आता कुठल्याही प्रकारचा संभ्रम किंवा वाद आमच्यामध्ये राहिलेल्या नाही, त्यामुळे सतीश चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी शिवसेना पूर्ण ताकतीने तन-मन-धनाने काम करेल, याचा पुनरुच्चार संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषदेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.