

Marathwadad Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघावर सलग तीन टर्म म्हणजे अठरा वर्ष आपले वर्चस्व कायम राखण्यात यशस्वी ठरलेल्या सतीश चव्हाण यांना 2026 मध्ये मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले. महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील या नवख्या उमेदवाने चव्हाण यांचा साडे अठरा हजार मतांच्या फरकाने पराभव केला. या पराभवानंतर पहिल्यांदाच माध्यमांसमोर आलेल्या सतीश चव्हाण यांनी आपल्या पराभवाची कारणे स्पष्ट केली.
सतीश चव्हाण यांनी अखेर निवडणुकीतील पराभवानंतर आपल्या विरोधात अँटी-इन्कम्बन्सी होती, अशी कबुली दिली. महसूल विभागाने अंतिम मतदार यादीतून अनेकांची नावे वगळली, माझ्याच काही जवळच्या लोकांनी काम केले नाही. महायुती असून शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी विरोधात काम केले, अशी अनेक कारणे आपल्या पराभवामागे असल्याचे त्यांनी सांगीतले.
या पराभवानंतर सतीश चव्हाण यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तत्त्पुर्वी चव्हाण यांनी विद्या प्रतिष्ठान (बारामती) येथे दिवंगत अजित पवार यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन अभिवादन केले.
निवडणुकीतील पराभवानंतर सतीश चव्हाण पहिल्यांदा आज माध्यमांना सामोरे गेले. यावेळी आपल्या पराभवाची कारणे सांगताना आपल्या विरोधात काही प्रमाणात मतदारांमध्ये रोष होता, हे त्यांनी मान्य केले. "राज्यात महायुती असताना शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या विरोधात काम केले. उघडपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. त्यामुळे बऱ्याच मतांवर प्रभाव पडला, ती विरोधी पक्षाच्या वाट्याला गेली. या संदर्भात आम्ही शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे निश्चित तक्रार करू".
यावर त्यांनी संबंधितांवर काही कारवाई केली नाही, तर आमच्या नेतृत्वाला सांगून अब्दुल सत्तार यांच्यावर कारवाई करायला भाग पाडू, असेही सतीश चव्हाण म्हणाले. निवडणूक काळात सोशल मिडियावर माझ्याविरोधात खोटा प्रचार केला गेला. मी अरोगंट आहे, अशी टीका करणारे हे विसरले की मी यापुर्वी तीन वेळा निवडून आलो आहे. याच मतदारांनी मला निवडून दिले होते. जर विरोधकांच्या आरोपात तथ्य असते तर त्यांनी मला सलग तीनवेळा निवडून दिले असते का? असा उलट सवालही चव्हाण यांनी केला.
मतदार यादी अद्ययावत करताना महसूल विभागाने अनेक मतदारांची नावे वगळल्याचा आरोपही चव्हाण यांनी केला. निवडणुकीच्या काळात यासंदर्भातील अनेक तक्रारी आणि अर्ज आपल्याकडे आले होते. मतदार यादीत नाव नसल्याने अनेकांना मतदान करता आले नाही. त्याचा फटका आपल्या निकालाला बसल्याचे चव्हाण यांनी सांगितले. 'या शिवाय माझ्या जवळच्याच काही लोकांनी काम केले नाही', असा आरोपही त्यांनी केला. देश पातळीवरील आंदोलनाचा, नात्यागोत्यांचा प्रभावही या निवडणुकीवर पडला, असे सांगतानाच अठरा वर्ष मी लोकांचा विश्वास जपला, असे चव्हाण म्हणाले.
'रविराज साबळे या तरुणाने चांगली लढत दिली', असे म्हणत चव्हाण यांनी त्यांचेही कौतुक केले. "नव्या तरूणांनी राजकारणात यायला हवे, आम्ही देखील अशा तरूण वयातच राजकारणात आलो", असेही चव्हाण यांनी सांगीतले.
चव्हाण यांनी महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्याने विरोधात काम केल्याचे आरोप करत विविध कारणे सांगितली आहेत. आता अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ते एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणती भूमिका मांडतात, याकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.