

Delhi Police protest : मागील काही महिन्यांत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीने अनेक आंदोलने पाहिली. प्रामुख्याने कॉक्रोच जनता पार्टीसह इंडिया आघाडीने केलेल्या विविध आंदोलनांमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. या आंदोलनांमध्ये दिल्ली पोलिसांची भूमिकाही महत्वाची राहिली होती. पण दोन अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून पोलिसच रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे.
दिल्लीतील शाहदरा जिल्ह्यातील सहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या बदलीविरोधात अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी थेट दिल्ली पोलीस मुख्यालयाबाहेरच निदर्शने केली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांची समजूत काढण्याचा बराच वेळ प्रयत्न सुरू होता. मात्र, कर्मचारी ऐकण्यास तयार नव्हते. त्यामुळे पोलीस यंत्रणेवरच नामुष्की ओढविल्याचे दिसून आले.
नेमकं काय घडलं?
काही दिवसांपूर्वी शाहदरा पोलीस ठाण्यात पोलीस आणि वकिलांमध्ये मोठा वाद झाला होता. यामध्ये एका वकिलाला गंभीर दुखापत झाल्याचा दावा केला जात आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने बंदूक रोखल्याचा आरोपही वकिलांनी केला होता. या घटनेविरोधात वकील आक्रमक झाले होते. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर दिल्लीतील वकील संघटनांनी बेमुदत काम बंदची हाक दिली होती.
वकील आक्रमक झाल्यानंतर एसीपी मनस्वी वशिष्ठ आणि पोलीस निरीक्षक अरुण कुमार यांची नुकतीच बदली करण्यात आली. या बदलीविरोधात पोलीस कर्मचारी आज आक्रमक झाले. विशेष म्हणजे पोलिसांच्या या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये वशिष्ठ हेही होते. त्यामुळे या आंदोलनाला महत्व प्राप्त झाले होते.
आंदोलनादरम्यान पोलिसांनी बदलीच्या आदेशाला विरोध दर्शविला. आंदोलन सुरू असताना पोलीस उपायुक्तांनी घटनास्थळी येऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पोलीस आहात, आंदोलकांप्रमाणे वागू नका, असे आवाहन त्यांनी केले. मात्र, त्यांच्या आवाहनाचा आंदोलकांवर परिणाम झाला नाही. पोलीस कर्मचाऱ्यांनी आपले आंदोलन सुरूच ठेवले. यावेळी अनुचित प्रकार घडू नये, म्हणून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.