
Mumbai News, 23 Jan : शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे (Babasaheb Thackeray) यांची आज जयंती आहे. यानिमित्त देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. 'प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या तत्वाशी कधीही तडजोड न करणाऱ्या बाळासाहेबांची वैचारिक कटिबद्धता सदैव प्रेरणा देत राहील', अशा शब्दात शहांनी आदरांजली वाहिली.
मात्र, यावरूनच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत म्हणाले, अमित शहांना बाळासाहेब ठाकरे माहीतीच नाहीत. शिवसेनेने प्रतिकूल परिस्थिती काय झुंज दिली हे त्यांना माहिती नाही. अमित शहांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेची जी परिस्थिती केली आहे.
त्या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आम्ही उभे आहोत. हीच बाळासाहेबांनी आम्हाला दिलेली प्रेरणा आहे. मात्र, मतांसाठी त्यांचं नाव घेणं प्रेरणा ठरत नाहीत, असा टोला त्यांनी शहांना लगावला. तर बाळासाहेब ठाकरे कृतीशील हिंदुहृदयसम्राट होते. हातात सत्ता नसताना त्यांनी मराठी माणसासाठी लढा दिला. शिवसेनेसारखी कवच कुंडलं तयार केली. ही कवच कुंडलं शहा (Amit Shah) आणि मोदींनी तोडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असं राऊत म्हणाले.
दरम्यान, यावेळी राऊतांनी बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न मिळायलाच हवं असंही म्हटलं. "बाळासाहेबांचा एक विचार होता, त्यांना ढोंग आवडत नव्हतं. ते ढोंगावर हल्ला करणारे नेते होते. या देशात हिंदुत्वाच्या नावावर ढोंग सुरू आहे, याचा प्रतिकार ठाकरेंची शिवसेना करत आहे. शाह आणि मोदींना माझं आव्हान आहे की त्यांनी हे ढोंग बंद करावं आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा भारतरत्न देऊन गौरव करावा.
मागील काही काळात राजकीय स्वार्थासाठी नियम डावलून भारतरत्न दिला जात आहे. पण ज्यांनी या देशात हिंदुत्त्वाचं बिज रोवलं आणि वाढवलं त्या बाळासाहेब ठाकरेंना अजून भारतरत्न का दिलं नाही? बाळासाहेबांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू होणार आहे, त्याआधी त्यांना भारतरत्न देणं गरजेचं आहे. यांनी वीर सावरकरांना देखील भारतरत्न देऊ शकला नाहीत. त्यामुळे बाळासाहेबांना भारतरत्न दिलात तर तो सावरकरांचाही गौरव ठरेल", असंही राऊत म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.