

Nanded News : नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत आमचे तीन आमदार युतीसाठी अशोक चव्हाण यांना दोनदा जाऊन भेटले. पण त्यांनी युती केली नाही, महापालिकेत युती करावी अशी विनंती शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी नुकतीच केली होती. ती करत असतानाच अशोक चव्हाण युती करणार नाहीत, अशी शक्यताही पाटील यांनी बोलून दाखवली होती. भाजपसोबत युतीसाठी शिवसेनेने पाच जणांची मुख्य समन्वय समिती नेमली आहे. अशोक चव्हाण मात्र युतीसाठी शिवसेनेला भाव देत नाहीयेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले होते.
महापालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू होण्याआधी युतीची बोलणी करण्याच्या दृष्टीने शिवसेनेकडून नांदेडमध्ये जोरदार हालचाली सुरू आहेत. युतीसाठी शिवसेनेने एक पाऊल पुढे टाकले असले तरी भाजपची पर्यायाने अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची युतीची अजिबात इच्छा नाही. त्यामुळे त्यांच्याकडून शिवसेनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर हेमंत पाटील यांनी बी प्लानची तयारी करत अशोक चव्हाण यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची गुरुवारी नांदेडमध्ये त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) युती करणार नाही, हे आधीच स्पष्ट केले आहे. शिवसेनेला सोबत घेण्याची त्यांची इच्छा नाही, त्यामुळे हेमंत पाटील यांनी चिखलीकर यांची भेट घेत युती संदर्भात चर्चा केल्याची माहिती आहे. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यापासून हेमंत पाटील, प्रताप पाटील चिखलीकर या जोडीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत युतीचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर तर हेमंत पाटील-चिखलीकर अशोक चव्हाण यांच्यावर अक्षरशः तुटून पडले होते.
अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याची कशी वाट लावली? हे सांगतांना दोघेही थकत नव्हते. महापालिका निवडणुकीसाठी भाजपसोबत युतीची बोलणी सुरू करण्याच्या आधीही हेमंत पाटील यांनी चव्हाण यांच्यावर त्यांनी महापालिकेच्या मोक्याच्या जागा बिल्डरांच्या घशात घातल्या, बीओटी आणून आपल्या मित्रांना कंत्राट देत भ्रष्टाचार केल्याचा उल्लेख पुन्हा केला. एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे त्याच अशोक चव्हाण यांच्यावर आरोप करायचे, या दुटप्पी धोरणामुळेच अशोक चव्हाण शिवसेनेला जवळ करत नाहीयेत.
अशोक चव्हाण यांना नको वाटेकरी..
अशोक चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणावर कामय आपली पकड राखली आहे. काँग्रेसमध्ये असताना जिल्ह्यातील महापालिका, जिल्हा परिषद व सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या त्यांच्याच ताब्यात होत्या. पक्ष बदलानंतर हीच परिस्थती कायम राखण्यासाठी अशोक चव्हाण यांनी जिल्ह्याचे नेतृ्त्व एकहाती हवे आहे. सत्तेत कोणी वाटेकरी नको, अशीच चव्हाण यांची भूमिका आहे. राज्य पातळीवर युती करा, असा संदेश देण्यात आला असला तरी गेल्या महापालिकेत काँग्रेसमध्ये असतांना अशोक चव्हाणांनी विरोधकांचा सफाया केला होता. भाजपमध्येही त्यांना हीच किमया साध्य करायची आहे. त्यासाठी युती नको, अशीच त्यांची भूमिका दिसते.
नांदेड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची फारशी ताकद नाही. सध्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे जिल्ह्याची धुरा अजित पवारांनी सोपवली आहे. चिखलीकर-चव्हाण यांच्या साप-मुंगसाचे वैर आहे. त्यामुळे अशोक चव्हाण कोणत्याही परिस्थिती चिखलीकरांना महापालिकेत शिरकाव करू देणार नाहीत. अशावेळी हेमंत पाटील यांनी चिखलीकर यांच्याकडे युतीसाठी पुढे केलेला हात कितपत फायद्याचा ठरेल हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.