

Shivsena-BJP News : छत्रपती संभाजीनगर महापालिकेत स्वबळावर सत्ता मिळवलेल्या भाजपाने जिल्हा परिषद निवडणुकीतही मित्रपक्ष शिवसेनेला सोबत घेतले नाही. शिवसेनेपेक्षा एक जागा अधिक जिंकत मोठा भाऊ ठरलेल्या भाजपाने 23 सदस्य असलेल्या मित्राला झेडपीत उपाध्यक्ष पदही मिळू दिले नव्हते. निवडणुकीत मिळालेली ही वागणूक शिवसेनेचे सदस्य, नेते, पदाधिकारी विसरलेले नाहीत. विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेने आता थेट भाजपाच्या अध्यक्षावर तोफ डागायला सुरूवात केली आहे. झेडपीतील शिवसेनेचे गटनेते राधाकिशन पठाडे यांनी अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्या शंभर दिवसाच्या कामकाजाचा पंचनामा करताना शून्य काम झाल्याची टीका केली आहे.
राज्यात दोस्ती आणि झेडपीत कुस्ती अशी चर्चा या आरोप-प्रत्यारोपानंतर जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपा हा सर्वात मोठा पक्ष ठरल्यापासून त्यांनी मित्र पक्षांना दुय्यम वागणूक देणे सुरू केल्याचा सूर मित्रपक्षांमध्ये आहे. महापालिका, जिल्हा परिषदेत शिवसेना बॅकफुटवर गेली आहे.
जिल्हा परिषदेत भाजपाने अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि महत्वाची सभापती पद आपल्याकडे राखल्यानंतर शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहे. भाजपाचा अध्यक्ष विराजमान होऊन शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे जिल्हा परिषदेतील गटनेते राधाकिशन पठाडे यांनी अविनाश गलांडे यांच्या कारभारावर टीका केली.
अध्यक्ष अविनाश गलांडे यांचे शंभर दिवसांतील काम 'शून्य' आहे. सत्ताधारी पक्ष प्रशासकीय इमारतीच्या फर्निचरच्या कामासह विविध विकास कामांसाठी निधी आणण्यास कमी पडत असल्याचीही तोफ त्यांनी डागली. निवडणुकीनंतर 18 मार्चला जि.प. अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडले गेले. पदाची सूत्र हाती घेतल्यापासून आतापर्यंत शंभर दिवसांच्या कालावधीत कोणतीच दखलपात्र कामे झाली नसल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षातील शिंदेसेनेचे गटनेते पठाडे यांनी अध्यक्ष गलांडे यांच्यावरील नाराजी व्यक्क केली.
सिंचन, रोहयो, जलजीवनची कामे अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत. आता पावसाळा लागला तरी अजून शाळांच्या वर्गखोल्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. उलट या कामासाठीच्या निविदेत ठेकेदाराकडे डांबर प्लांटची अट घातलेली आहे. विशिष्ट ठेकेदारालाच काम देण्यासाठी ही अट घातलेली दिसतेय. मागे स्थायी समितीच्या बैठकीत खतांच्या आॅनलाइन सिस्टीमला आम्ही विरोध केला. मात्र त्यावरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे यावरून दिसते.
जि.प. इमारतीच्या फर्निचरच्या कामासाठी निधी कमी पडत असताना शासनाकडून आणण्याऐवजी जि.प.च्या उपकरातून 14 कोटींची तरतूद केली जात आहे, त्यास आमचा विरोध आहे. या सर्व बाबींवर 30 जूनच्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित केला जाईल, असे पठाडे यांनी नमूद करत भाजपाला घेरण्याचे संकेत दिले आहेत.
पठाडे यांच्या टीकेवर जि.प. अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी मात्र आमच्यात कुणीही विरोधक नाही. पठाडे बोलले असले तरी ते त्यांचे वैयक्तीक मत आहे. त्यांच्या पक्षाचे सदस्य, सभापती आज माझ्यासोबच बैठकीला होते. जि.प. इमारतीसाठी उपकराचा निधी वापरण्याचा प्रस्ताव हा प्रशासकीय आहे.
तरीही त्यांनी सभेत प्रश्न उपस्थित केल्यास त्याचे समाधानकारक उत्तर आम्ही देऊ. 100 पैकी 45 दिवस निवडणुकीच्या आचारसंहितेत गेले. तरीही तालुकानिहाय 9 पंचायत समिती स्तरावर आम्ही विविध कामांचा आढावा घेतला. त्यातून रोहयो, जलजीवन मिशन, सिंचन, ग्रामपंचायत स्तरावरील विविध कामांची स्थिती जाणून घेतली. आता या सर्व कामांना गती देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.