

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईत उपचारा दरम्यान निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईतील बेलापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातील विशेषतः सोयगाव तालुक्यात राजू राठोड यांचे चांगले काम होते. दांडगा जनसंपर्क आणि सर्व पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध जपणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती.
शिवसेना पक्ष फुटल्यानंतर बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता राजू राठोड यांनी नगरपंचायत निवडणुकीपुर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शिवसेनेत प्रवेश केला होता.
सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी त्यांना शिवसेनेत आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. तालुक्यात सत्तार आणि राजू राठोड यांची मैत्री नेहमी चर्चेत असायची. सोयगाव तालुक्यातील हनुमंत खेड्याचे सरपंच म्हणून राठोड यांनी आपल्या राजकारणाला सुरूवात केली होती.
नुकत्याच झालेल्या सोयगाव खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत सत्तार यांनी त्यांच्यावर चेअरमन पदाची जबाबदारी सोपवली होती. पत्नी व मुलगी मोनालीच्या रुपाने जिल्हा परिषदेच्या राजकारणातही ते सक्रीय होते.
मध्यंतरी त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना आधी जुलै महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारा दरम्यानच राजू राठोड यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अकाली निधनाने सिल्लोड-सोयगाव तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
विश्वासू साथीदार गमावला-अब्दुल सत्तार
राजुभाऊ राठोड यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोन दिवसांपूर्वी, सोमवारी मुंबईतील बेलापूर येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली होती. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. ही भेटच अखेरची ठरली. यापूर्वी ६ जुलै रोजी त्यांना याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही भेटी दरम्यान राजूभाऊंनी नेहमीप्रमाणे मनमोकळेपणाने संवाद साधला होता.
त्यांचा हसतमुख स्वभाव, आपुलकीने बोलण्याची पद्धत आणि जिव्हाळ्याचे संबंध कायम स्मरणात राहतील. राजूभाऊंचे अकाली जाणे मनाला चटका लावून जाणारे आहे. त्यांच्या निधनाने एक जिव्हाळ्याचा सहकारी, मित्र आणि आपला माणूस आपण गमावला आहे, अशा शब्दात आमदार अब्दुल सत्तार यांनी राठोड यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या.
त्यांच्या निधनाने केवळ एक सहकारी नव्हे, तर माझा जिव्हाळ्याचा मित्र, मार्गदर्शक आणि राजकारणातील विश्वासू साथीदार आम्ही गमावला आहे. राजू भाऊ राठोड यांना राजकारणाचा सखोल अभ्यास होता. ग्रामीण भागाची इत्थंभूत माहिती, कार्यकर्त्यांशी असलेला जिव्हाळा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ठळक वैशिष्ट्ये होती.
अनेक निवडणुका आम्ही खांद्याला खांदा लावून एकत्र लढलो. या प्रदीर्घ राजकीय प्रवासात अनेक सुख-दुःखाचे प्रसंग आम्ही सोबत अनुभवले. आज त्यांची साथ कायमची सुटली, ही भावना मनाला चटका लावणारी आहे. त्यांच्या जाण्याने शिवसेनेची तसेच सोयगावच्या सामाजिक व राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांची उणीव सदैव जाणवत राहील, अशा शब्दात सत्तार यांनी राठोड यांना श्रद्धांजली वाहिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.