Shiv sena-BJP News :भाजपला अर्जुन खोतकर यांचा कडक इशारा; 'स्वबळाची खाज असेल तर मिटवून टाकू'!
शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला कडक इशारा दिला आहे.
“युती करायची नसेल तर आम्हीही स्वबळावर लढण्यास तयार आहोत,” असे खोतकर म्हणाले.
या वक्तव्यामुळे शिवसेना-भाजप युतीवर नव्या चर्चांना उधाण आले आहे.
Marathwada Political News : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती करायची की स्वबळावर लढायचे? याचे अधिकार शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी स्थानिक पातळीवरील नेत्यांना दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर दानवे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव सादर केला. परंतु यावर भाजपकडून कुठलीही प्रतिक्रिया किंवा निरोप शिवसेनेला देण्यात आलेला नाही.
भाजपकडून सेनेचा प्रस्ताव वेटिंगवर ठेवल्यामुळे संतापलेल्या अर्जुन खोतकर यांनी कडक इशारा देत 'तुमची खाज असेल तर ती मिटवून टाकू, काही विषय नाही' असे म्हणत आपली ही स्वबळावर लढण्याची तयारी असल्याचे म्हटले आहे. मतांची विभागणी नको या हेतूनेच आपण भाजपला युतीचा प्रस्ताव दिला आहे. आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वीस तारखेपर्यंत युतीची वाट पहा अन्यथा स्वबळावर लढा, असे आदेश दिले आहेत.
तरीदेखील भाजपच्या निर्णयाकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. मात्र त्यांना स्वबळावर लढण्याची खाज असेल तर ती मिटवून काही अडचण नाही, अशा शब्दात त्यांनी भाजपला ठणकावले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी मराठवाड्यात भाजपा आणि शिवसेनेने बहुतांशी ठिकाणी स्वबळावर लढणार हे जवळपास निश्चित केले आहे. शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, संतोष बांगर यांनी यापूर्वीच आपल्या मतदारसंघात स्वबळाची घोषणा केली आहे.
तर काल परभणीत पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनीही स्वबळावर लढण्याची भाषा केली. एकूणच मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेना- भाजप युती स्वतंत्र लढणार असे चित्र आहे. अर्जुन खोतकर यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचे महानगराध्यक्ष भास्कर पाटील दानवे यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युतीचा प्रस्ताव दिला होता. यावर दानवे यांनी युतीचा प्रस्ताव आम्हाला प्राप्त झाला आहे. यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो शिवसेनेला कळविण्यात येईल असे सांगत प्रस्ताव वेटिंगवर ठेवला.
दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे, माजी आमदार कैलास गोरंट्याल यांना मात्र स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढवायची आहे. शिवाय 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काम केल्याचा राग त्यांच्या मनात असल्यामुळे पहिल्याच महापालिका निवडणुकीत अर्जुन खोतकर यांना धक्का देण्यासाठी गोरंट्याल, रावसाहेब दानवे सज्ज झाले आहेत.
महापालिकेत भाजपचाच महापौर होणार असा छातीठोकपणे दावा कैलास गोरंट्याल करताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेच्या युतीच्या प्रस्तावाला फारसे गांभीर्याने पाहिले जात नाहीये. या संदर्भात अर्जुन खोतकर यांना भाजप स्वबळाच्या तयारीत असल्याबद्दल विचारले तेव्हा, त्यांना जर खाज असेल तर ती आम्ही मिटवू, असा थेट इशाराच खोतकर यांनी दिला. मतांची विभागणी होऊ नये या हेतूने आम्ही युतीचा प्रस्ताव भाजपला दिला आहे. परंतु त्यांना जर सोहळावरच लढायचे असेल तर आमची काहीही हरकत नाही आम्हीही तयार आहोत असे म्हणत खोतकर यांनी भाजपला आव्हान दिले आहे
5
1. अर्जुन खोतकरांनी काय वक्तव्य केले?
अर्जुन खोतकरांनी भाजपाला इशारा देत सांगितले की, युती करायची नसेल तर शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार आहे.
2. हे वक्तव्य कधी आणि कुठे करण्यात आले?
हे वक्तव्य त्यांनी जालना येथे माध्यमांशी बोलताना केले.
3. युतीबाबत शिवसेनेचा सध्याचा काय दृष्टिकोन आहे?
शिवसेना सध्या युतीसाठी तयार असली तरी स्वबळावर लढण्याचाही पर्याय खुला ठेवला आहे.
4. भाजपाची या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया आहे?
भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र पक्षातील अस्वस्थता दिसून येत आहे.
5. या वक्तव्याचा आगामी निवडणुकांवर काय परिणाम होऊ शकतो?
या वक्तव्यामुळे युतीबाबतचा तणाव वाढू शकतो आणि राजकीय समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.