

Parbhani ZP Election News : जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत परभणीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धक्का बसला आहे. माजी मंत्री रावसाहेब जामकर यांचे नातू आणि पक्षाचे स्थानिक नेते संग्राम जामकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हाती घेतला. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला जय महाराष्ट्र केल्यानंतर जामकर आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उतरले आहेत. आमदार राजेश विटेकर यांनी हा प्रवेश घडवून आणला आहे.
नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत परभणीत सर्वाधिक 25 जागा जिंकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा मोठा ठरला आहे. महापालिकेत शिवसेना-काँग्रेस आघाडीची सत्ता आणि महापौर बसणार आहे. असे असताना जिल्हा परिषदेच्या धामधुमीत संग्राम जामकर यांनी पक्ष सोडल्यामुळे ठाकरेंच्या पक्षाला हा धक्का समजला जात आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ग्रामीणच्या जिल्हाप्रमुखाने पक्ष सोडत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर इकडे परभणीतही पक्षाला गळती लागल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतर संग्राम जामकर हे जांब जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवत आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात जामकर कुटुंबाचा दबदबा आहे. माजी मंत्री रावसाहेब जामकर यांनी गावच्या सरपंच पदापासून थेट मंत्रीपदापर्यंतचा राजकीय प्रवास केला. त्यांच्या राजकीय निवृत्तीनंतर त्यांचे चिरंजीव अॅड. बाळासाहेब जामकर व विजयराव जामकर यांनी राजकारणात सक्रिय सहभाग घेतला.
राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अॅड. बाळासाहेब जामकर हे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षही होते. तर विजय जामकर यांनी सुरुवातीला नगरपालिकेत व नंतर महापालिकेत राजकारण केले. यानंतर जामकर कुटुंबाची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली. संग्राम जामकर यांनी बदलत्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करून राजकारणाला सुरवात केली.
मागील जिल्हा परिषद निवडणुकीत जांब जिल्हा परिषद गटातून पदरी अपयश आल्यानंतरही संग्राम जामकर हे लोकांच्या संपर्कात राहिले. आता पुन्हा बदलती राजकीय समीकरणे ओळखत संग्राम जामकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या प्रवेशामुळे परभणी जिल्ह्यातील राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.