Chhatrpati SambhjiNagar News : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंगळवारी संभाजीनगरात जाहीर सभा झाली. या सभेतून त्यांनी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यावर त्यांना आपल्या मुला-मुलीला मुख्यमंत्री करायचे आहे, अशी टीका करत घराणेशाहीचा आरोप केला. यावर ठाकरे गटाकडूनही भाजप व अमित शाह यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपमधल्या घराणेशाहीसह देशातील अनेक परिवारांतील सत्ता कोणाच्या हाती आहे, याची जंत्रीच समोर मांडली.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल परिवारवादावर बरीच धूळफेक केली. हे बोलताना ते मात्र स्वतः उभे असलेल्या व्यासपीठावर पाहायला विसरले, असा टोला दानवे यांनी लगावला. तसेच व्यासपीठावरील घराणेशाहीचे उदाहरण असलेली ही काही नावे, असे म्हणत भली मोठी यादीच समाज माध्यमातून समोर ठेवली. यात राज्याचे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून पंजाब, बिहार, मेघालय अशा देशातील विविध राज्यांची नावे देत भाजपवर निशाणा साधला.
महाराष्ट्रात शोभा फडणवीस - देवेंद्र फडणवीस, गोपीनाथ मुंडे - पंकजा मुंडे, शंकरराव चव्हाण-अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे - संतोष दानवे यांची नावे देत दानवे यांनी भाजपला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. शिवाय यांच्याकडे डोळेझाक, कारण ते तुमच्यासोबत आहेत, असा टोलाही लगावला.
त्याशिवाय असले काही पक्षही तुमच्यासोबत आहेत, ज्यांचा पायाच एक घराणे आहे, असे सुनावले. शिरोमणी अकाली दल (पंजाब), पासवान परिवार (बिहार), राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (महाराष्ट्र), नॅशनल पीपल्स पार्टी (मेघालय), जनता दल सेक्युलर (कर्नाटक), राष्ट्रीय लोक दल (उप्र, राजस्थान), अशी उदाहरणे दानवे यांनी दिली. अजून बरीच आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या गोष्टी आम्हाला कशाला सांगता, महाराष्ट्रात ठाकरे घराण्यावर लोकांनी प्रेम केले आहे. जोपर्यंत ठाकरे तुमच्यासोबत तोपर्यंत ते चांगले आणि विरोधात गेले की घराणेशाहीचा पुरस्कर्ते? ही डबल ढोलकी वाजवणे लोकांना दिसते. हा कावा महाराष्ट्रात चालणार नाही. ध्यानी असू द्या.. वाऱ्या तुमच्या, पण वारे आमचेच आहे, असा टोलाही दानवे यांनी अमित शाह व भाजपला लगावला.
(Edited by: Sachin Waghmare)
R