Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumare) यांची त्यांच्याच पैठण मतदारसंघात कोंडी करण्याचे प्रयत्न ठाकरे गटाने केला आहे. शिवसेनेकडून सहा वेळा उमेदवारी, पाचवेळा विजय, दोनवेळा मंत्रीपद मिळूनही संदीपान भुमरे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाला साथ दिली. तेव्हापासून भुमरे हे ठाकरे गटाच्या रडारवर आहेत. (Shivsena UBT News)
आता आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या खेळीने मंत्री भुमरे घायाळ झाले आहेत, अशी चर्चा आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पैठणमध्ये संदीपान भुमरे यांना घाम फोडणाऱ्या आणि अवघ्या 14 हजार मतांनी पराभूत झालेल्या राष्ट्रवादीचे दत्ता गोर्डे यांचा आज मुंबईत मातोश्रीवर ठाकरे गटात प्रवेश झाला आहे. (Latest Political News)
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पुढाकाराने गोर्डे पुन्हा हाती शिवबंधन बांधून घेतले आहे. दत्ता गोर्डे तसे पुर्वीचे शिवसैनिकच, पण भुमरे यांच्या राजकारणाला कंटाळून त्यांनी आधी भाजप, नंतर राष्ट्रवादी आणि आता पुन्हा शिवसेना ठाकरे गटात 'घरवापसी' केली आहे. दत्ता गोर्डे हे शिवसेनेत असतांना पैठण नगर परिषदेमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष राहिले आहेत.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली आणि त्यांनी संदीपान भुमरे यांना तगडी फाईट दिली. मात्र गोर्डे यांचा 14 हजार मतांनी पराभव झाला होता. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दत्ता गोर्डे यांना ठाकरे गटाने पुन्हा पक्षात घेत मंत्री संदीपान भुमरे व त्यांचे पुत्र विलास भुमरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून दत्ता गोर्डे यांनी संदीपान भुमरे, विलास भुमरे यांच्याविरोधात मतदारसंघात आघाडी उघडली आहे. पैठण शहरातील बसस्थानकाजवळील भूखंडाचे प्रकरण,याशिवाय भुमरे मंत्री असलेल्या रोजगार हमी योजनेतील कामात झालेल्या भ्रष्टाचार अशी प्रकरण बाहेर काढत गोर्डे यांनी भुमरेंना तालुक्यात आव्हान दिले होते.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर भुमरे शिंदेंसोबत गेले, तेव्हापासून ठाकरे गट त्यांच्याविरोधात आक्रमक झाला आहे. अगदी युवासेनेच अध्यक्ष आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पैठण मतदारसंघात दौरे करत मेळावे घेतले होते. यातून पाचवेळा निवडून आलेल्या भुमरेंनी पैठणचा काय विकास केला? फक्त दारुची दुकाने काढली असे आरोप करत निशाणा साधला होता. आता भुमरेंच्या विरोधात दत्ता गोर्डे यांना बळ देत ठाकरे गट येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांना घरी बसवण्याच्या तयारीत असल्याच बोलले जात आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.