Chhatrapati Sambhajinagar News : महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्यासाठी काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सभा घेतली. 45 मिनिटांच्या भाषणात ठाकरेंची तोफ नरेंद्र मोदी, भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर धडधडत होती. नकली संतान, नकली शिवसेना या टीकेमुळे ठाकरेंच्या टीकेची धार वाढल्याचे दिसून आले. या शिवाय महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्याविरोधात त्यांच्या दारुच्या व्यवसायाचा मुद्दा उचलून धरत ठाकरे यांनी सभा गाजवली.
ठाकरेंच्या या सभेनंतर आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शहरातील क्रांतीचौकात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात मोठा राडा झाला. शक्ती प्रदर्शनानंतर एकमेकांच्या अंगावर धावत जाऊन दंड थोटपत दोघांनी आपला जोर दाखवला. भुमरेंवर त्यांच्या दारुच्या व्यवसायावरुन अधिक कोंडी करण्यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी हातात दारूच्या बाटल्या घेऊन महायुतीला डिवचले. दोन-तीन तास सुरु असलेला राडा प्रचार संपल्यानंतर थांबला.
तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत तब्बल दोन लाखांच्या मताधिक्याने विजयाचा दावा केला. चंद्रकांत खैरे हे सुमारे दोन लाख मतांनी विजयी होतील, असा दावा अंबादास दानवे व संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला. लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघासाठी सोमवारी (ता. 13) मतदान होत आहे. यंदाची लोकसभेची निवडणूक गद्दार विरुद्ध खुद्दार व दारू पाहिजे का? पाणी पाहिजे? अशा विषयावर होत आहे.
महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांना शहरात एकही मोठी सभा घेता आलेली नाही. उलट महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार, युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे, सुषमा अंधारे यांच्यासह इतरांच्या सभा झाल्या. जनमताचा कौल आमच्या बाजूने आहे, असा दावा दानवे यांनी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
तर छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणी जिल्ह्यातील काही भागाचा मी संपर्कप्रमुख आहे. या तीनही जागेवर महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार, अशी खात्री संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी दिली. चंद्रकांत खैरे हे दोन लाख मतांनी विजयी होतील या दानवेंच्या दाव्याचे घोसाळकर यांनी समर्थन केले. शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संभाजीनगरात गेल्यावेळी एमआयएमचे इम्तियाज जलील निवडून आले होते.
यावेळी महायुतीचे भुमरे- महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. वंचित आणि काही अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी तिरंगी लढतीत कोणाची सरशी होणार? याचा फैसला 13 मे रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.