Loksabha Election 2024 : 'मी संभाजीनगरचा पहिला हिंदू आमदार आहे.', असं गर्वाने सांगणारे शिवसेना नेते व लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगरचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची गुरुवारी ईद निमित्त आयोजित कार्यक्रमात चांगलीच अडचण झाल्याचे दिसून आले. कारण, कट्टर हिंदुत्ववादी अशी ओळख असलेले खैरे हिंदुत्वाच्या मुद्यावरच या लोकसभा मतदारसंघातून सलग चारवेळा निवडून गेले होते.
परंतु गेल्या लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांचा एमआयएमच्या इम्तियाज जलील यांच्याकडून अवघ्या साडेचार हजार मतांनी पराभव झाला होता. त्यानंतर गेली पाच वर्ष खैरे माजी खासदार म्हणून जिल्ह्यात वावरत होते. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडी आणि शिवसेनेमध्ये पडलेली फूट या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीसोबत लोकसभेची निवडणूक लढवत असलेल्या ठाकरे गटाने आता कट्टर हिंदुत्व सोडून काहीशी व्यापक भूमिका घेतल्याचे चित्र आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राज्यात भाजपच्या विरोधात असणाऱ्या मतदारांना विशेषत: मुस्लीम समुदायाला आपलेसे करण्याचे प्रयत्न गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना ठाकरे गटाकडून केले जात आहेत. पक्ष फुटीनंतर ठाकरे गटाला मुस्लीम समुदायाची सहानुभूती असल्याचे बोलले जाते. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे रमजान ईदच्या निमित्ताने शहरातील ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी चंद्रकांत खैरे गेले होते.
इम्तियाज जलील(Imtiaz Jaleel) हे देखील तिथे आवर्जून उपस्थित होते. खैरे-इम्तियाज जलील हे दोघे जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याची चर्चा होते. ईदची नमाज झाल्यानंतर बाहेर पडणाऱ्या मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी एक मंडप उभारण्यात आला होता. तिथे वरिष्ठ पोलिस अधिकारी, राजकीय नेते मंडळी हस्तांदोलन आणि गळाभेट घेत शुभेच्छा देत होते. खैरे आणि इम्तियाज जलील यांच्यात बरेच अंतर होते, त्यामुळे शुभेच्छा देऊन झाल्यानंतर खैरे तिथून निघण्याच्या तयारीत होते.
पण त्यांना जाऊ न देता गळाभेट घेऊन शुभेच्छा देण्याचे इम्तियाज जलील यांनी जणूकाही ठरवलेच होते. गर्दी कमी होताच इम्तियाज जलील आपल्या जागेवरून खैरेंच्या दिशेने गेले, खैरे निघणार तोच इम्तियाज जलील यांनी खैरेंचा हात हाती घेतलाा आणि त्यांची गळाभेट घेतली. ईद मुबारक म्हणत त्यांना शुभेच्छा दिल्या.
याक्षणी काहीसे अवघडलेल्या खैरे यांनी स्मित हास्य करत इम्तियाज यांच्या शुभेच्छांचाच स्वीकार केला आणि माध्यमांनी गराडा घालण्याआधीच खैरे तिथून निघून गेले. इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या या गळाभेटीची चर्चा झाली नाही तरच नवलच. एकमेकांना ईद मुबारक म्हणून शुभेच्छा देणाऱ्या खैरे-इम्तियाज यांच्यापैकी लोकसभा विजयाची ईदी कोणाला मिळणार? याची चर्चा यानिमित्ताने सुरू झाली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.