Chhatrapati Sambhajinagar, 11 May : माजी खासदार राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लोकसभेच्या निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे ठरवले आहे. त्यानुसार मराठवाड्यातील लोकसभेच्या जालना मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने नुकताच महाविकास आघाडीचे उमेदवार कल्याण काळे यांना पाठिंबा जाहीर केला.
त्यानंतर आज निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Shetkari sanghatana) एका अपक्ष उमेदवाराला सशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. ते अपक्ष उमेदवार दुसरे तिसरे कोणी नसून गेल्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवून निकाल फिरवणारे हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) हे आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, तेलंगणा प्रमाणे पेरणीसाठी आर्थिक मदत यांसह विविध प्रश्न लोकसभेत मांडण्याच्या अटींवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हर्षवर्धन यांना हा पाठिंबा जाहीर केला आहे. आपण सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गेली अनेक वर्ष लढा देत आहोत. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने ज्या अटींवर मला पाठिंबा जाहीर केला आहे, त्या सर्व मला मान्य असून निवडणुकीत जिंकल्यानंतर हे सगळे प्रश्न मी लोकसभेत मांडेल, अशी ग्वाही हर्षवर्धन जाधव यांनी दिली.
संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी, एमआयएम अशी तिरंगी लढत होत आहे. वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार देत या निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. परंतु 2019 च्या निवडणुकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तब्बल दोन लाख 83 हजार मते मिळवत संभाजीनगर मतदारसंघाचा निकाल फिरवणारे हर्षवर्धन जाधव या निवडणुकीत पुन्हा अपक्ष म्हणून मैदानात असताना त्यांची फारशी चर्चा होताना दिसत नाही. ते मात्र, विजयाचा दावा करीत आहेत.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रचाराचा शेवटचा दिवस असताना हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचा हर्षवर्धन जाधव यांना किती फायदा होतो? हे चार जूनच्या निकालानंतर स्पष्ट होईल. हर्षवर्धन जाधव हे टीव्ही या निशाणीसह रिंगणात आहेत. पण, गेल्या वेळी त्यांनी प्रचारात जशी मुसंडी मारली होती, तशी किमया यावेळी मात्र त्यांना साधता आलेली नाही. त्यामुळे निवडणूक रिंगणात असूनही हर्षवर्धन जाधव या वेळी दुर्लक्षितच दिसतात.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.