Beed Political News : बीड जिल्ह्यामध्ये 2014 पूर्वीच्या काँग्रेस-आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुरेश धस, तत्कालीन बीड जिल्हा परिषद शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला या तिघांनी शिक्षक आंतरजिल्हा बदलीमध्ये तब्बल 39 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केला आहे. या बदली प्रकरणात शिक्षकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्यात आले होते. 1300 हून अधिक शिक्षकांकडून पैसे घेऊन या बदल्या करण्यात आल्या होत्या, असा आरोपही सानप यांनी केला.
बीड येथे पत्रकारांशी संवाद साधताना सानप यांनी बीड जिल्ह्यात आतापर्यंत कधीही बिंदू नामावलिचा विषय आला नव्हता, मग 14 वर्षानंतर हा मुद्दा उपस्थित करत जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न का केला जातोय? असा असा सवाल सानप यांनी उपस्थित केला. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांमध्ये बिंदू नामावलिचे पालन झाले की नाही? हे तपासण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. बीड जिल्ह्यात फोफावणारा जातियवाद रोखण्यासाठी बिंदू नामावलीचे तंतोतंत पालन केले जावे, असा आग्रह (Suresh Dhas) सुरेश धस यांनी धरला होता.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीड जिल्ह्यातील शासकीय अधिकारी, कर्मचार्यांची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल केली होती. त्यावर एकाच समाजाचे लोक पदावर कसे काय? बिंदू नामावलिचा नियम बीड (Beed News) जिल्ह्यात लागू होतो की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी या मुद्द्याची गंभीर दखल घेत बिंदू नामावलिनुसारच शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्या नियुक्ती आहेत का? हे तपासण्यासाठी समिती स्थापन केली होती.
त्यानंतर बीड जिल्ह्यात खऱ्या अर्थाने हा मुद्दा चर्चेला आला. याच मुद्द्यावरून आता ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी 2014 मधील आंतरजिल्हा शिक्षक बदली प्रकरण पुढे करत आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला यांच्यावर थेट पैसे घेऊन तब्बल 39 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या संदर्भात शिक्षक संघटनांना सोबत घेऊन लवकरच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री यांची भेट घेणार असल्याचे सानप यांनी सांगितले.
14 वर्षानंतर बीड जिल्हा परिषदेत बिंदू नामावलिचा प्रश्न उद्भवला आहे. ज्यावेळी आंतरजिल्हा बदल्या सुरू होत्या त्या काळात सर्व शिक्षकांनी बीड जिल्ह्यामध्ये आम्हाला परत यायचे आहे, अशी मागणी केली होती. त्यावेळी मंत्री असलेल्या सुरेश धस यांनी तत्कालीन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सय्यद अब्दुल्ला, शिक्षण सभापती संदीप क्षीरसागर यांना हाताशी धरून शिक्षकांच्या भरत्या केल्या होत्या. तब्बल तेराशे शिक्षकांकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेण्यात आले होते. ही रक्कम 39 कोटी रुपयांच्या वर जाते, असा दावाही सानप यांनी पत्रकार परिषदेत केला. हे सर्व पैसे सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि अब्दुल्ला यांच्या खिशात गेले असा थेट आरोपी त्यांनी केला.
बिंदू नामावलिच्या माध्यमातून एका समाजाला टार्गेट करण्याची काम सुरेश धस यांच्याकडून केली जात आहे. 2014 ते 2024 दरम्यान बिंदू नामावलिचा प्रश्न कुठेही आला नाहीस मग आत्ताच तो का निर्माण केला जात आहे, असा सवाल करत धस हे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत असल्याचे सानप म्हणाले. दरम्यान सुरेश धस यांनी पंकजा मुंडे मंत्री असताना या भरत्या झाल्या होत्या, असा दावा केला होता. सानप यांनी तो दावाही खोडून काढला.आघाडी सरकार राज्यात सत्तेवर होते आणि त्या मंत्रिमंडळात सुरेश धस मंत्री होते. त्यामुळे पंकजा मुंडे यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असे सानप यांनी स्पष्ट केले.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.