

Beed politics News: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या फायर ब्रँड उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आमदार धनंजय मुंडे यांना भाऊ म्हणत मंत्रिपदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. परळी शहरातील एका कार्यक्रमात अंधारे यांनी 'माझा भाऊ मंत्री होऊ दे', अशा शब्दात धनंजय मुंडे यांना शुभेच्छा दिल्या. गोकुळच्या निवडणुकीवरून राजकीय वातावरण तापलेले असताना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या बद्दल सुषमा अंधारे यांनी अचानक प्रेम दाखवले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत.
परळी शहरातील एका संस्थेच्या उद्घाटनासाठी धनंजय मुंडे आणि सुषमा अंधारे या एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. दीपावलीच्या शुभेच्छा देताना सुषमा अंधारे यांनी याच व्यासपीठावरून 'माझा भाऊ मंत्री होऊ दे, पुढच्या भाऊबीजेला धनुभाऊ यांच्या नावासमोर माजी मंत्री नाही, तर आजी मंत्री लागू दे', अशा सदिच्छा व्यक्त केल्या.
परळी मतदारसंघाकडे कायम राज्यातील सत्ता केंद्र म्हणून बघितले गेले. यापुढेही ते अबाधित राहावे, अशी इच्छाही सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांना मंत्रिपदासाठी शुभेच्छा देतानाच त्यांच्या समोरच "गोकुळ दूध संघामध्ये अध्यक्षपद आणि सत्तेसाठी महायुती सरकारने सहकार कायद्यात बदल करत लोकशाही पायदळी तुडवली" अशी टीका अंधारे यांनी सरकारवर केली.
धनंजय मुंडे यांच्या समोरच सरकारवर तोफ डागत असताना सुषमा अंधारे यांनी याच सत्तेतील पक्षाच्या एका आमदाराला मात्र मंत्रिपद मिळावे अशा शुभेच्छा दिल्या. धनंजय मुंडे यांचा माझा भाऊ असा उल्लेख अंधारे यांनी केल्याने व्यासपीठावरील अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. स्वतः धनंजय मुंडे यांनीही अंधारे यांच्या या शुभेच्छांवर स्मित हास्य करत आश्चर्य व्यक्त केले.
राज्यात मंत्रिमंडळ विस्तार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. शिवसेनेच्या उपनेते सुषमा अंधारे कायम महायुती सरकार आणि त्यांच्या चुकीच्या धोरणांवर तुटून पडतात. काही दिवसांपूर्वी अंधारे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. याप्रसंगी धनंजय मुंडे यांनी पक्षीय भेद विसरत सुषमा अंधारे यांच्या परळी तालुक्यातील गावातील घरी जाऊन त्यांची सांत्वन पर भेट घेतली होती.
त्यानंतर काल पाडव्याच्या निमित्ताने एका कार्यक्रमात धनंजय मुंडे आणि सुषमा अंधारे या एकाच व्यासपीठावर आले होते. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मीक कराड याचा मुख्य आरोपी म्हणून समावेश आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रीपदाच्या राजीनामासाठी सुषमा अंधारे यादेखील आग्रही होत्या.
ज्या सुषमा अंधारे यांनी धनंजय मुंडे यांचा या प्रकरणावरून मंत्रिपदाचा राजीनामा मागितला आणि पुढे तो झाला ही. त्याच धनंजय मुंडे यांचा उल्लेख माझे भाऊ असा करत अंधारे यांनी चक्क त्यांना मंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्याने बीड जिल्ह्याच्या राजकारणात याची चर्चा चांगलीच रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.