

MLC elections: धाराशीव जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत हे राजकारणात बाजी पलटवणारे नेते म्हणून ओळखले जातात. अनेक वाद-विवाद आणि कायम पैशाची भाषा यामुळे ते अडचणीत आल्याची उदाहरणे आहेत. तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारासाठी त्यांचे महत्त्व अधिक असल्याचे दिसून आले. महायुतीकडे संख्याबळ, बहुमत असले तरी बसवराज पाटील कोणतीही जोखीम स्वीकारायला तयार नाहीत.
तानाजी सावंत हे बेधडक बोलण्यासाठी परिचित आहेत, त्यांच्या या फटकळ स्वभावामुळे त्यांचे मित्रपक्षच काय पण त्यांच्या पक्षातील आमदारांशीही फारसे जमत नाही. पण कोणत्याही निवडणुकीत बाजी पलटवण्याची त्यांची ताकद नाकारून चालणार नाही. याच कारणामुळे लातूर-बीड-धाराशीव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी कुठल्याही आजी-माजी आमदाराला सोबत न घेता थेट पुण्यात जाऊन तानाजी सावंत यांची भेट घेतली. या त्यांच्या भेटीकडे बसवराज पाटील यांचा सेफ गेम म्हणून पाहिले जात आहे.
धाराशीव जिल्ह्यातील भाजप व शिवसेनेचे राजकीय सख्य पाहता भाजपाचे नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील व माजी आमदार सुजितसिंह ठाकूर या आजी माजी आमदारांना दूर ठेवत झालेली ही भेट चर्चेचा विषय ठरत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद निवडणुकांत शिवसेनेला विरोध करत तानाजी सावंत यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न भाजपाच्या पुढाकाराने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येत केला होता. मात्र भुम - परांडा मतदार संघात आमदार सावंत यांनी एक हाती वर्चस्व प्रस्थापित केले.
मताचा एकगठ्ठा आकडा त्यांचेकडे असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत आमदार सावंत यांचे उपद्रविता मूल्य लक्षात घेता चाणाक्ष बसवराज पाटील यांनी वादाला संधी मिळू नये म्हणून एकट्यानेच सावंत यांची पुण्यात जाऊन भेट घेतल्याचे बोलले जाते. सावंत यांनी देखील महायुतीचा धर्म पाळणार असल्याचे सांगत बसवराज पाटील यांना मदतीचा शब्द दिला आहे.
जिल्हा परिषद, नगरपरिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या अनुषंगाने अनेक ठिकाणी भाजप आणि शिवसेना आमनेसामने उभे ठाकले होते. स्थानिक स्तरावर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका करत स्वतंत्र राजकीय भूमिका घेतली होती. अनेक ठिकाणी युतीची शक्यता नाकारत भाजपने स्वबळाचा नारा दिला होता. मात्र विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती बदलताना दिसत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सदस्यांच्या मतदानावर आधारित असलेल्या या निवडणुकीत प्रत्येक मताला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे महायुतीचे बसवराज पाटील यांनी शिवसेना आमदार तानाजी सावंत यांची भेट घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, रामचंद्र घोगरे तालुका प्रमुख अण्णासाहेब जाधव आदी उपस्थित होते.
जिल्ह्याच्या राजकारणात भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील व शिवसेना आमदार तानाजी सावंत यांच्यात सख्य नाही. आमदार सावंत यांनी अप्रत्यक्षपणे पाटील यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. तर परांडा व भूम नगर परिषदेच्या निवडणूकीत शिवसेनेच्या विरोधात दोन्ही ठिकाणी भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली जनशक्ती शहरविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढविण्यात आली. भाजपाचे माजी आमदार ठाकूर व शिवसेना आमदार सावंत यांनी एकमेकांवर सडकून टिका केली होती. परंडा मतदार संघात शिवसेना आमदार तानाजी सावंत यांचा शब्द मानणारे जवळपास तीस मतदार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.