
Raksha Khadse Help: आजच्या काळात लहान मुलांसोबत परदेशी हवाई प्रवास जणू पालकांसाठी कठीण परीक्षाच झाली आहे. कारण छत्रपती संभाजी नगर इथल्या एका कुटुंबाला एअरलाईनच्या चुकीचा मोठा फटका बसला. मध्यरात्री पॅरीस विमानतळावर अडकून पडलेल्या या कुटुंबाच्या मदतीला केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे धावून आल्या आणि हे कुटुंब सुखरूप भारतात परतलं.
मूळच्या छत्रपती संभाजी नगर येथील असलेल्या आणि सध्या अमेरिकेत स्थायिक असलेल्या नेहा महाजन यांना पुण्यात आजारी असलेल्या आईच्या भेटीसाठी तातडीनं भारतात यायचं होतं. त्यासाठी त्यांनी विमानाची तिकीटं काढली, पण दोन वर्षाच्या चिमुकलीचा व्हिसा नसल्यानं मोठी अडचण निर्माण झाली. मुलीशिवाय जाणं शक्य नव्हतं, इमर्जन्सी व्हिसाला ७२ तासांचा अवधी लागणार होता. आपली मोठी अडचण झाल्यानं शुक्रवारी सकाळी महाजन कुटुंबीयांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना संपर्क केला. दहाच मिनिटांत खडसे यांची यंत्रणा कार्यरत झाली आणि महाजन कुटुंबाकडून लहान मुलीच्या आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. दिल्लीतील यंत्रणा आणि अमेरिकेतली दुतावासाशी संपर्क साधत काही तासांतच रक्षा खडसे यांनी चिमुकलीला व्हिसा मिळवून दिला. अखेर दांपत्य अमेरिकेतून भारतात येण्यासाठी विमानात बसले.
पण अमेरिकेतून निघालेल्या विमानानं पॅरिस विमानतळावर थांबा घेतला यावेळी आठ वर्षाच्या मुलाच्या पासपोर्ट व्हिसामध्ये तांत्रिक अडचणीचं कारण सांगून एअरलाइन व सुरक्षा यंत्रणांनी कुटुंबाला अडवलं त्यासाठी दोन तास विमानही थांबवण्यात आलं. फ्रेंच कर्मचारी कुठल्याही भारतीय व्यक्तीशी बोलण्यास सुद्धा तयार नव्हते. महाजन यांचा भारतीय दुतावासातील अधिकाऱ्यांशी संपर्क होत नव्हता, अशा परिस्थितीत मंत्री खडसे यांनी पर्यायी एअर इंडियाच्या विमानानं मुलांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. दोन तासाच्या गोंधळानंतर अखेर यशस्वी वार्तालाप झाल्यानंतर एअर फ्रान्सनं रविवारी पहाटे हे कुटुंब भारतात लँड झालं.
परदेशातील फ्रेंच अधिकारी व विमानाचे कर्मचारी यांनी पॅरिस विमानतळावर अत्यंत उर्मट वागणूक देत त्रास दिल्याचा अनुभव नेहा यांना आला. याउलट मुंबई विमानतळावर भारतीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुटुंबीयांना धीर देत मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबई एअरपोर्टवर कुटुंबाला सुरक्षा संदर्भात अडचण येऊ नये म्हणून भारतीय अधिकारी वर्ग आणि पहाटेही महाजन कुटुंबाच्या संपर्कात होते. पण तरीही या कुटुंबाच्या निम्म्या बॅगा एअरलाइन्सच्या चुकीमुळं पॅरिस विमानतळावरच अडकून पडल्या आहेत. याप्रकाराचा मोठा त्रास सहन करावा लागल्यानं फ्रान्सच्या एअरलाईन कंपनीविरोधात विमान प्राधिकरणाकडं आपण तक्रार करणार असल्याचं नेहा महाजन यांनी सांगितलं आहे.
ऐन मध्यरात्री पॅरिस विमानतळावर अडकलेल्या महाजन कुटुंबीयांना भारतात आणण्यासाठी अनेकांनी सहकार्य केलं. यामध्ये केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे सहाय्यक वैयक्तिक सचिव अतुल महाजन, डीजीसीए मुंबईचे एअर सेफ्टी ऑफिसर योगेश काकडे, अमेरिकेतील व्यावसायिक आलोक कुमार आक्से, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल बाविस्कर मुंबई पोलीस, पॅरिस येथील एअर इंडियाच्या मुख्य व्यवस्थापक अनघा मथुरे, आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू प्रतीक चौधरी, एअर इंडियाचे केबिन मॅनेजर सागर दळवी, मुंबई कार्गो विभागाच्या रिंकी चोटे हे फोनवर व इतर माध्यमातून एकमेकांशी समन्वय साधून संपर्कात होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.