
Mumbai News : राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये भाजपसोबतच एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस या तीन प्रमुख पक्षांचा समावेश आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सर्वांचाच सत्ताधारी महायुतीवर फोकस होता. जनतेनी आठ महिन्यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत दिले. त्यामुळे सत्ताधारी मंडळी पोटतिडकीने जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतील, अशी अपेक्षा होती. मात्र, हे पावसाळी अधिवेशन गाजले ते सभागृहाबाहेरील घटनेने. सत्तेत असलेल्या भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळीने मारहाण करीत 'फायटिंग स्किल' दाखवत वर्तुळ पूर्ण केले आहे. त्यामुळे या तीन पक्षाच्या नेतेमंडळीने विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे.
पावसाळी अधिवेशन सुरु असताना मंत्रालयाच्या कँटिनमध्ये भातावरच वरण खराब निघाले म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केली. गायकवाड यांनी बनियन व टॉवेलवर कँटिनच्या कर्मचाऱ्याला जोरात मारहाण केली. यामुळे या घटनेचे पडसाद अधिवेशन काळात उमटले. आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधून जेवण मागवले होते. ते जेवण खराब असल्याचे लक्षात आले. त्याच संतापात त्यांनी खाली कॅन्टिनमध्ये जात 'मला विष खायला घालतो का' असे विचारले आणि कॅन्टिनच्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली.
प्लास्टिकच्या पिशवीत पार्सल केलेल्या डाळीला वास येत असल्याचा दावा करत त्यांनी कर्मचाऱ्याला त्याचा वास घ्यायला लावला आणि गायकवाड यांनी मारहाण केली. त्यामुळे या प्रकरणावरून आमदार गायकवाड वादात अडकले.या मारहाणीचा व्हिडीओही व्हायरल झाला. या व्हिडीओत संजय गायकवाड कर्मचाऱ्याला मारताना दिसत आहेत. या प्रकरणी त्यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. मी कारवाईला घाबरत नाही, असे त्यांनी सांगितले असले तरी संजय गायकवाड एका प्रकारे अडचणीतच आले आहेत.
त्यानंतर विधान भवनात जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतच्या वादानंतर भाजप (BJP) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरातच आव्हाडांच्या समर्थकला मारहाण केली होती. विशेष म्हणजे यातील एका आरोपीवर मकोकाची कलम आहे. जिथे राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची धुरा सांभाळली जाते, आशा विधीमंडळाच्या परिसरातून याच आरोपीने कायदा सुव्यवस्थेची धिंड काढली. त्यामुळे या सर्व प्रकारानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना या सर्व प्रकाराबाबत सभागृहाची माफी मागितली तर जितेंद्र आव्हाड यांना देखील या ठिकाणी सभागृहाची माफी मागावी लागली.
त्यानंतर हा त्रिकोण पूर्ण करण्याची जबाबदारी सत्तेतील अजित पवार यांच्या गटाने अधिवेशनानंतर पार पडली आहे. लातूरमध्ये कोकाटे यांच्या पत्ते खेळण्याविरोधात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या गटाचे प्रवक्ते आणि पदाधिकाऱ्यांनी छावा संघटनेच्या आंदोलकांना जबर मारहाण केली. या घटनेचे पडसाद संपूर्ण मराठवाड्यात उमटले आहेत. या प्रकाराबाबत राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी माफी मागितली असली तरी छावा संघटनेकडून त्यांच्या विरोधात आंदोलन सुरु केले आहे.
लातूरमधल्या या घटनेनंतर सत्तेतील तिन्ही पक्षांमधल्या लोकांच्या मारहाणीचा वर्तुळ देखील पूर्ण झाला आहे. सुरुवातीला शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कँटिनमधील कर्मचाऱ्याला मारहाण केली तर त्यानंतर भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांनी विधिमंडळ परिसरातच आव्हाडांच्या समर्थकला मारहाण केली होती. तर रविवारी लातूरमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर पत्ते फेकून निषेध केला म्हणून छावा संघटनेच्या कार्यकर्त्याना राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मारहाण केली.
या सर्व प्रकारामुळे सत्ताधारी महायुतीमधील नेत्याविषयी नाराजी व्यक्त केली जात असून या सर्व घटनांनी विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात या विरोधात विरोधक आक्रमकपणे रस्त्यावर उतरणार आहेत. त्यामुळे लातूरमधील मारहाण प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.