
Marathwada Flood : मराठवाड्यातील मोठ्या भागात सध्या मुसळधार पावसामुळं निर्माण झालेल्या पूरस्थितीनं मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. यानिमित्त शेतकऱ्यांची अवस्था जाणून घेण्यासाठी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट धाराशिवमधील शेतकऱ्यांचा बांध गाठला. यावेळी पण उपमुख्यमंत्र्यांना पाहताच हवालदिल झालेले शेतकरी बांधव आक्रमक झालेले पाहायला मिळाले, यावेळी अनेकांनी त्यांना घेरलं आणि तक्रारी सांगायला सुरुवात केली. त्यामुळं काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि आमदार तानाजी सावंत यांनी परांडा गावातील करंजा वस्ती इथं हजेरी लावली. हा तानाजी सावंत यांचा मतदारसंघ आहे. शिंदेंनी सरकारी मदतीऐवजी टेम्पोनं खासगी मदत घेऊन इथं पोहोचले. या मदतीच्या पॅकेटवर एकनाथ शिंदे आणि तानाजी सावंत यांचे फोटो आहेत. दरम्यान, हे तिघेजण नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल होताच तिथं उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी एकाच वेळी त्यांच्यासमोर आपलं गाऱ्हाणं मांडण्यास सुरुवात केली. काही शेतकरी यावेळी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाले.
यामुळं इतका प्रचंड गोंधळ वाढला की कोण काय म्हणतंय हे देखील ऐकायला येत नव्हतं. यावेळी एका शेतकऱ्यानं अत्यंत हतबलतेनं म्हटलं की, सर लय देवानं परेशान केलंय. तर दुसऱ्या एका शेतकऱ्यानं संतप्तपणे आम्हाला तुमची मदत नको तुमचा टेम्पो घेऊन जा. तर आणखी एका शेतकऱ्यानं आम्हाला मदत घेऊ द्या, आमचा संसार पाण्याखाली गेलाय, अशा शब्दांत आपली हतबलता कथन केली.
दरम्यान, परांडा भागात पूरामुळं ९० हजार हेक्टरचं नुकसान झालं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तसंच यावेळी शेतकऱ्यांची समजूत घालताना शिंदे म्हणाले की, "आम्ही इथं तुमच्या मदतीसाठीच आलो आहोत. त्यामुळं तुम्ही शांत राहा, प्रशासनं आपल्या डोळ्यानं हे नुकसान बघितलं आहे. आम्ही ऑफिसमध्ये बसलो का? किंवा तुम्हाला आम्ही बोलावलं का?" यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले की इथं जी घरं पाण्याखाली गेली आहेत, त्यांच्या पुनर्वसनासाठी तातडीनं प्रस्ताव मांडा. तसंच इथल्या पुलाचा जो प्रश्न आहे त्याचाही तातडीनं प्रस्ताव तयार करा. भविष्यात कितीही पाऊस पडला तरी यांना त्याची अडचण होणार नाही याची हमी देतो. यावेळी शेतकऱ्यांनी आमचं योग्य पुनर्वसन करा ही मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर लावून धरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.