Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठवाड्यातील परभणी जिल्हा उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव आणि परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील यांनी पक्ष अडचणीत असताना निष्ठा दाखवत जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी संजय जाधव यांना उमेदवारी देत त्यांच्या `निष्ठे`चा योग्य सन्मान केला.
जाधव यांनी महाविकास आघाडीच्या संघटित ताकदीच्या जोरावर एक लाखाहून अधिक मताधिक्य घेत परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच बालेकिल्ला असल्याचे दाखवून दिले. (Parbhani) आता उद्धव ठाकरे यांनी परभणीचे विद्यमान आमदार राहुल पाटील यांच्या हाती मशाल देत त्यांना मैदानात उतरवले आहे. आता त्यांना प्रतिक्षा आहे ती विरोधात महायुतीकडून धनुष्यबाण-घड्याळ की मग कमळ असेल? याची.
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयाने आत्मविश्वास बळावलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल परभणीत पुन्हा पेटणार का ? याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. शिवसेनेला अधिकृत राजकीय पक्षाची मान्यता आणि धनुष्यबाण चिन्ह मिळवून देणाऱ्या परभणी ने कायम भगव्याला साथ दिली. 1990 ते 2019 यादरम्यान परभणी शहरावरील शिवसेनेचा भगवा कधी खाली उतरला नाही.
हनुमंतराव बोबडे यांच्या रूपाने 90 मध्ये पहिल्यांदा परभणी शहरात शिवसेनेचा भगवा फडकला. त्यानंतर संजय जाधव, तुकाराम रेंगे पाटील आणि आता राहुल पाटील यांनी प्रत्येकी दोन वेळा विजय मिळवत परभणी हा शिवसेनेचाच गड असल्याचे दाखवून दिले आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद गेले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पक्षात बंड झाले आणि 40 आमदार फुटून भाजपला जाऊन मिळाले. राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेना संपली, असे म्हणणाऱ्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतील विजयाने चपराक बसली.
या विजयाची पुनरावृत्ती राहुल पाटील विधानसभेला करतात का? आणि स्वतः विजयाची हॅट्रिक साधतात का? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधानसभा उमेदवारांची यादी काल जाहीर झाली. यामध्ये परभणी मतदार संघातून विद्यमान आमदार राहुल पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
सात वेळा शिवसेनेचा आमदार
सलग सात वेळा या मतदारसंघाने शिवसेनेचा आमदार निवडून दिलेला आहे. आता आठव्यांदा राहुल पाटील विजयी होतात का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीच्या मोहम्मद गौस जेन यांचा पराभव केला होता.
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती तुटल्यामुळे मैदानात दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिले होते. याचा फायदा राहुल पाटील यांना झाला. एमआयएमच्या अली खान मोईन खान यांनी 22 हजार 700 मते घेतली होती. तर अपक्ष सुरेश नागरे यांनी साडेआठ हजार मते घेत परभणीच्या लढतीमध्ये रंगत आणली होती. काँग्रेसच्या अशोक देशमुख यांनी साडे पंधरा हजार मते मिळवत काँग्रेसचा मतदार काही प्रमाणात आपल्याकडे खेचला होता.
परभणीत झालेल्या या बहुरंगी लढतीत राहुल पाटील यांनी बाजी मारली. 2014 मध्ये शिवसेना-भाजप युती तुटली तेव्हा मत विभाजन होऊन तिसऱ्या पक्षाचा फायदा होईल, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अशाही परिस्थितीत राहुल पाटील यांनी पहिला विजय मिळवला. त्यांनी एमआयएमच्या सय्यद खलील सय्यद साहेब जान यांचा 35000 मतांच्या फरकाने पराभव केला.
तर भाजपच्या आनंदराव भरोसे यांना 42000 मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे प्रताप देशमुख 11 हजार 375 तर काँग्रेसच्या खान इरफान रहमान अब्दुल रहमान खान यांना फक्त 7342 मते मिळाली होती. याशिवाय बहुजन समाज पक्ष देखील मैदानात होता. तेव्हाही राहुल पाटील यांनी विजय मिळवत शिवसेनेचा भगवा फडकवत ठेवला.
राज्यात विशेषत: मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या प्रश्नाने जोर धरलेला आहे. सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मराठा आरक्षणावरून असलेला रोष सत्ताधारी महायुती विरोधात गेला होता. मराठवाड्यात आठ पैकी सात लोकसभेच्या जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. तर केवळ छत्रपती संभाजीनगर लोकसभेची जागा महायुतीला जिंकता आली होती.
परभणीत मात्र संजय जाधव यांनी महाविकास आघाडीकडून लढताना दणदणीत विजय मिळवला. याच विजयाची पुनरावृत्ती विधानसभेला परभणीत होते का? महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्याविरुद्ध असलेल्या नाराजीचा फायदा विधानसभेलाही होतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.