
छत्रपती संभाजीनगर : विधानसभेच्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून पराभूत झालेले एमआयएमचे उमेदवार तथा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी आपल्या आयुष्यातील ही सर्वात भ्रष्ट निवडणूक होती, असे म्हणत संताप व्यक्त केला. भाजपचे मंत्री अतुल सावे विरुद्ध इम्तियाज जलील अशी 'काँटे की टक्कर' या मतदारसंघात झाली. शेवटपर्यंत निकाल कोणाच्या बाजूने लागेल याचा अंदाज येत नव्हता. अखेर अवघ्या 2100 मतांनी अतुल सावे विजयी झाले.
निवडणुकी दरम्यान, एमआयएम-भाजपमध्ये अनेक ठिकाणी चकमक झाली. सावे यांनी पैसे वाटल्याचा आरोप, तर इम्तियाज (Imtiaz Jaleel) यांनी महिलेचा हात धरला इतपर्यंतचे आरोप झाले. यातून निवडणुकीचे वातावरण तापले, तक्रारी, गुन्हे दाखल होण्यापर्यंत प्रकरण गेले. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला, अतुल सावे विजयी झाले मात्र इम्तियाज जलील यांच्या मनातील खदखद कायम आहे.
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर इम्तियाज यांनी या पराभवाची कारणे सांगताना विधानसभेची ही सर्वात भ्रष्ट निवडणूक असल्याचे सांगत संताप व्यक्त केला. (AIMIM) एमआयएम दोन वेळा हरलेल्या पूर्व मतदारसंघात विद्यमान मंत्र्यांचे आव्हान होते. ते स्वीकारून मी लढलो. ते जिंकले अन् मी हरलो असलो तरी एमआयएमने बरोबरीने मते घेतली. या सर्व डावपेचात खऱ्या अर्थाने मी हरूनही जिंकलो. त्यांनी पैसे खर्च न करता निवडणूक लढली असती तर आज मी विधानसभेत आणि ते घरी बसले असते!
पण, राजकारणात 'जर- तर' ला किंमत नसते. खिलाडूवृत्ती ठेवून आम्ही पुढे जात आहोत, असे इम्तियाज जलील म्हणाले. मतदानाच्या दिवशी महिलांना दीड हजार, एजंटला पाचशे रुपये दिले जात होते, मुस्लिम महिलांना रिक्षातून आणून त्यांच्या बोटाला शाई लावली जात होती. सर्व शासकीय यंत्रणा सत्ताधारी पक्षांना निवडून आणण्यासाठी तत्पर होती. मी निवडणूक काळातील गैरप्रकाराच्या तक्रारी केल्या. हा लढा मी सुप्रीम कोर्टापर्यंत घेवून जाईल, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.
एमआयएमने आपली प्रतिमा बदलली म्हणून अकबरूद्दीन औवेसी यांची क्लिप वारंवार दाखवून प्रतिमा हनन केले जात आहे. त्या वक्तव्याचे मीसुद्धा समर्थ करत नाही. मात्र, त्यासाठी त्यांनी चार महिने कारवास भोगला. आज त्यांच्यापेक्षाही अधिक प्रक्षोभक भाषणे करून तेढ निर्माण केली जात आहे. त्यांच्यावर कधीही कुठलीही कारवाई होत नाही. हा दुजाभाव का, असा सवाल इम्तियाज यांनी केला.
प्रचारासाठी हिंदु वसाहतीत आपल्या वाईट अनुभव आला. कुणाच्या घरी गेलो तर लोक दबाव आणायचे, जय श्रीराम च्या घोषणा द्यायचे. हिरव्या सापाला कशाला बोलावले, असे म्हटले गेले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यावर तिथे शुद्धीकरण केले जायचे. हे सगळे मी आणि माझ्या मुलाने भोगले आहे, असेही इम्तियाज जलील यांनी सांगितले.
तरीही पंधरा हजार मते एमआयएमला एकही मुस्लिम मतदार नसलेल्या वसाहतीतून मिळाली. याचा विचार करूनच आम्ही आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती आखत आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजपाने या निवडणुकीत पाण्यासारखा पैसा खर्च केला. लोकांना ईव्हीएम नको, या यंत्रावर संशय आहे तर नरेंद्र मोदी यंत्रणेत बदल का करीत नाहीत? यात मोठ्या पक्षांनी जनआंदोलन करावे, आम्ही सोबत राहू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.