
Ranajagjeetsinh Patil News : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला अखेर शिखर समितीकडून मंजूरी देण्यात आली आहे. या आराखड्याला स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी सुरुवातीला विरोध दर्शवला होता. परंतु सगळे आक्षेप आणि सूचनाचा विचार करून बदल केल्यानंतर अखेर या आरखड्यास मंजूरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्र विकासासाठी परिपूर्ण अंतिम प्रारूप विकास आराखडा मित्रचे उपाध्यक्ष आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आला होता.
प्रशासकीय मान्यतेसाठी तो मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता. 4 फेब्रुवारीच्या बैठकीत यात काही बदल सुचवण्यात आले होते. त्याचे अनुपालन करून तो पुन्हा सादर करण्यात आला होता. 17 मार्च रोजी झालेल्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली असून 1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीने अंतिम मंजुरी दिली असल्याची माहिती, तुळजाभवानी मंदिर संस्थानचे विश्वस्तआमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मुख्य दर्शन मंडप व तेथील अनुषंगिक सुविधा,श्री तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देतानाचा 108 फुटाचा पुतळा, घाटशिळ, महामार्गाजवळील सोलापूर बायपास पट्टयामध्ये व हडको येथे भक्तनिवास, प्रसादालय, पुस्तकालय, भोजनालय, भाविक सुविधा केंद्र,वाहनतळ तयार करणे, वृंदावन गार्डनप्रमाणे आधुनिक उद्यान, वृध्द व दिव्यांगाकरिता लिफ्ट, ट्रॅव्हलेटर आदी बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. (Ranajagjeetsinh Patil) तसेच विकास कामांसाठी आवश्यक भूसंपादनाकरिता देखील निधीची तरतूद ठेवण्यात आली आहे. भूसंपादन व शासकीय करापोटी आवश्यक असणारे शुल्क तसेच विकासकामांसाठी लागणारा निधीसाठीचा अंतिम प्रारूप आराखडा प्रशासकीय मान्यतेसाठी उच्चाधिकार समितीकडे सादर करण्यात आला होता.
त्यास आता मान्यता मिळाली असून 1866 कोटींचा आराखडा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीकडे पाठवण्यात आला होता. तुळजाभवानी देवीचे क्षेत्र वैश्विक दर्जांचे धार्मिक पर्यटन केंद्र म्हणून विकसित व्हावे यासाठी सर्वसमावेशक प्रक्रियेचा अंगीकार करण्यात आला आहे. पुजारी, भाविक व शहरवासीयांच्या सूचनांचा अभ्यास करुन योग्य आक्षेप व सूचनांचा आरखड्यात अंतर्भाव करण्यात आला आहे. शहरात व शहराकडे सोलापूर, बार्शी, धाराशिव, औसा व नळदुर्गकडून येणाऱ्या पाच प्रमुख रस्त्यावरील प्रवेशाच्या ठिकाणी आकर्षक कमान बसवण्याच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी यांची भेट घेण्याचे ठरले असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
भूसंपादनासाठी भरघोस मावेजा
तुळजापूर शहरातील नागरिक आणि पुजारी बांधवांना विश्वासात घेऊन भूसंपादन प्रक्रिया राबवली जाणार आहे. प्रचलित दाराच्या कैक पटीने विकास आराखड्यासाठी जमिनीचे भूसंपादन केले जाणार आहे. त्यासाठी सादर करण्यात आलेल्या या अंतिम विकास आराखड्यात 30 टक्के तरतूद केवळ भू संपादन प्रक्रियेसाठी करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांची जागा तीर्थक्षेत्र तुळजापूरच्या विकासासाठी संपादित केली जाणार आहे त्यांना समाधानकारक मावेजा मिळणार आहे. सर्वांच्या सहमतीने आणि सर्वांना विश्वासात घेऊन, जमिनीचा चांगला मोबदला देण्यात येणार असून आई तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र जागतिक दर्जाचे करण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही राणापाटील यांनी सांगितले.
विकास आराखडा आणि त्यातील काही मुद्यांवर आक्षेप घेण्यात आला होता. यावरूनच काही पुजारी आक्रमक झाले होते. दर्शन मंडप हा तुळजाभवानी देवीच्या मुख्य महाद्वार येथे असावा, अशी पुजारी आणि व्यापाऱ्यांची मागणी होती. दर्शन मंडपाची जागा बदलल्यामुळे काही व्यापाऱ्यांचे आणि स्थानिक नागरिकांचे नुकसान होणार होते, त्यामुळे या आराखड्याला कडाडून विरोध झाला होता. अगदी तुळजापूर बंद करून या आराखड्याला विरोध केल्यामुळे तो रखडणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. परंतु व्यापारी, स्थानिक नागरिकांच्या मागणीनूसार विकास आराखड्यात बदल करण्यात आले. सर्वांचे समाधान झाल्यानंतर आता या विकास आरखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.