Tushar Rathod : आमदार तुषार राठोडांना दिल्लीत पाठवण्याची खेळी? अशोक चव्हाण, चिखलीकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Nanded Politics News: नांदेडमध्ये आमदार तुषार राठोड यांना खासदार होण्यासाठी अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी शुभेच्छा दिल्या. या वक्तव्यांमुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे आणि मंत्रिपदाच्या चर्चांना वेग आला आहे.
Tushar Rathod
Tushar RathodSarkarnama
Published on: 
Updated on: 

Nanded politics News: मुखेडचे तीन टर्म आमदार असलेले भाजपचे तुषार चव्हाण यांच्या मतदारसंघात मंगळवारी साईबाबांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. जिल्ह्याचे नेते तथा भाजपचे खासदार अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. तुषार राठोड यांचे कौतुक करताना अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी त्यांना खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आमदार तुषार राठोड हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. तीन टर्म आमदार आणि राजकारणाचा दीर्घ अनुभव पाहता त्यांना महायुती सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा आहे. 2019 मध्ये राज्यात शिवसेना-भाजप युतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्याचवेळी राठोड यांना मंत्रीपदाची लॉटरी लागणार अशी जिल्ह्यात चर्चा होती.

मात्र राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला आणि राठोड यांचे मंत्री होण्याचे स्वप्नही अपुरे राहिले. शिवसेनेत फूट पडल्यानंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेवरून पायउतार झाले आणि एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. तर याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारावी लागली. त्यामुळे अनेकांच्या इच्छा आकांक्षांवर पाणी फिरले.

2024 मध्ये राज्यात शिवसेना भाजप युतीची पुन्हा सत्ता आली. मुख्यमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा चालून आले. आता आपल्याला मंत्रिपदाची संधी मिळणार असे वाटत असतानाच अनपेक्षितपणे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला आणि मंत्री पदाच्या रांगेत असलेल्या भाजपच्या अनेकांना पुन्हा वेटिंग वर जावे लागले.

नांदेड जिल्ह्याचा विचार केला तर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमधून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उडी घेत प्रताप पाटील चिखलीकर हे आमदार झाले. लोकसभा निवडणुकीच्या अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे राज्यातील तत्कालीन नेते अशोक चव्हाण यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. या सर्व घडामोडींमुळे भाजपच्या नांदेड जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांना काहीसे बॅक फुटवर जावे लागले. आमदार तुषार राठोड हे त्यापैकीच एक. परंतु कालांतराने राठोड यांनी स्वतंत्रपणे यंत्रणा हलवत नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे आपल्या हाती घेतली.

Tushar Rathod
Gokul Election: विधानसभेचा राग गोकुळ निवडणुकीत काढला; भर स्टेजवर जनसुराज्यच्या नेत्याने राष्ट्रवादीचे पितळ पाडले उघडे

अर्थात अशोक चव्हाण जिल्ह्याचे नेते असताना हे तसे सोपे नव्हते. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक तुषार राठोड यांना येथे कामी आली. थेट फडणवीस यांनीच जिल्हा बँकेचे अध्यक्ष पदासाठी तुषार राठोड यांच्या नावाची शिफारस केली, आणि अशोक चव्हाण यांनी त्यास संमती दर्शवली. सध्या तुषार राठोड नांदेड जिल्हा बँकेचा कारभार सांभाळत आहेत. राज्यात महायुतीचे सरकार असताना नांदेड जिल्ह्याला लाल दिवा नाही ही सल अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना आहे. अशोक चव्हाण यांना केंद्रात संधी मिळेल अशी अपेक्षा त्यांचे समर्थक बाळगून होते. तर राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली वर्णी लागेल असा विश्वास चिखलीकर यांना होता.

मात्र राज्यातील सामाजिक राजकीय परिस्थिती आणि देश पातळीवर सुरू असलेले आंदोलनच्या घडामोडी पाहता राज्य आणि केंद्रात सध्या तरी मंत्रिमंडळ विस्ताराच्या कुठल्याही हालचाली दिसत नाहीत. तरी जेव्हा केव्हा राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होईल तेव्हा त्यामध्ये आपली वर्णी लागावी, त्यात पुन्हा स्पर्धक नको या हेतूनेच अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांनी तुषार राठोड यांना खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत का? अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकारणात सुरू झाली आहे.

तुषार राठोड यांचे मुख्यमंत्र्यांकडे वाढलेले वजन, अशोक चव्हाण यांच्या एकहाती वर्चस्वासाठी अडसर ठरत आहे. मंत्रिमंडळ विस्तारात नांदेड जिल्ह्याला प्रतिनिधित्व देण्याचा निर्णय झाला तर तुषार राठोड यांना झुकते माप दिले जाईल, अशी भीती चिखलीकरांना वाटते आहे. त्यामुळेच कदाचित आमदार तुषार राठोड यांना खासदार होण्यासाठी या दोघांनी शुभेच्छा दिल्या असाव्यात, अशी खमंग चर्चा महायुतीत सुरू आहे.

नेमकं काय घडल?

नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथील भाजपाचे आमदार तुषार राठोड हे खासदार व्हावे अशा शुभेच्छा खासदार अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीर यांनी दिल्या.राठोड हे स्वतः राज्याच्या मंत्रिमंडळात समावेशासाठी उत्सुक आहेत. मंत्रीपदाबाबतच्या प्रश्नावर त्यांनी मुख्यमंत्री न्याय करतील, असे म्हणत आपल्या मनातील सुप्त इच्छा बोलून दाखवली आहे. असे असताना अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे जिल्ह्यातील दोन मातब्बर नेते मात्र तुषार राठोड यांना दिल्लीत पाठवण्याच्या तयारीत दिसून येत आहेत.

Tushar Rathod
Abhijeet Dipke: "मोदींनी हिंमत दाखवून अधिकृत आणीबाणी जाहीर करावी"; अभिजीत दिपके पंतप्रधानांवर इतके का भडकले?

जिल्ह्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय स्पर्धक असलेल्या अशोक चव्हाण यांनीही चिखलीकर यांची रीघ ओढत तुषार राठोड यांना खासदार होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. चांगल काम करा ईश्वर तुमच्या सोबत आहे, आमदार होणार की खासदार होणार की आणखी काही होणार हे साईबाबा ठरवतील, असा टोलाही चव्हाण यांनी लगावला. मात्र तुषार राठोड यांची इच्छा काय आहे? मला माहित आहे. साईबाबा जे ठरवतील ते आम्ही मान्य करू, हे सांगायला ही अशोक चव्हाण विसरले नाहीत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com