

Uddhav Thackray: राज्यात भाजपची सत्ता आणि पैशाची मस्ती सुरू आहे. पण ही मस्ती दाखवाल तर ज्याप्रमाणे बांगलादेशात लोक रस्त्यावर उतरले आहेत, तशी महाराष्ट्रातील जनता तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. विकास कामांवर बोला, दोन हजार देतो म्हणणाऱ्या फडणवीसांनी हिंदू-मुसलमान वादाशिवाय भाषण करून दाखवावे मी, एक लाख रुपये देतो, असे आव्हानही उद्धव ठाकरे यांनी दिले.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील उमेदवारांच्या प्रचारार्थ मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर उद्धव ठाकरे यांची शिवगर्जना सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजप, एकनाथ शिंदे, अजित पवार, अमित शहा यांच्यावर टीका केली. ज्या अजित पवारांवर भाजपने सत्तर हजार कोटींचे आरोप केले होते, त्यांच्याच मांडीला मांडी लावून मी बसतो असे तोंडवर करून ते सांगत आहेत. मग त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जे ढिगभर पुरावे त्यांच्याविरोधात दिले होते त्यात तथ्य होते की नाही?
जर ते पुरावे खरे होते आणि त्यात तथ्य असेल तर मग केसचा निकाल लागत नाही, तोपर्यंत अजित पवारांना सरकारमधून बोहर ठेवण्याची हिमंत दाखवा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडवीस यांना दिले. जर तुमच्या ढिगभर पुराव्या तथ्य नसेल, ते खोटे असतील तर मग फडणवीस तुम्ही अजित पवारांची माफी मागा, असेही ठाकरे म्हणाले. रावसाहेब दानवे यांच्यावर टीका करतांना बाळासाहेबांनी तुमच्या तोंडात दोन घास तेव्हा घातले नसते तर तुमचा राजकीय कुपोषणाने मृत्यू झाला असता, असा टोला लगावला.
जगातला सर्वात मोठा पक्ष म्हणून सांगता पण तुम्हाला उमेदवार मिळत नाहीत म्हणून पळवापळवी करतायेत. पक्ष चोरता, चिन्ह चोरता, आमचे वडीलही चोरता, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली. छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाचे श्रेय घेणाऱ्या अमित शहा यांनी अहमदाबादचे नाव बदलून दाखवावे, आहे का हिंमत? तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार? बदलापूरमध्ये मुलीवर अत्याचार करणाऱ्या सहआरोपीला स्वीकृत सदस्य तु्म्ही करता, विकृत माणसाला तुम्ही स्विकृत करता हे तुमचं हिंदुत्व का? असा सवाल ठाकरेंनी यांनी भाजपला केला. पालघरच्या घटनेत आपण कोणालाही सोडलं नव्हत, याच मेवाभाऊंनी आपल्यावर तेव्हा टीका केली होती. आज याच घटनेतील आरोपीला तुम्ही पक्षात घेता, हे तुमचं हिंदुत्व? भाजप महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला नेतोयं. पक्ष फोडतोय, चिन्ह चोरतोय,निष्ठावंतांची भाजपमध्ये अत्यंत वाईट अवस्था असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आम्ही आणलेली पाणी योजना, गुंठेवारी, एमआयडीसी, कचऱ्याचा प्रश्न सोडवला या विकासाच्या गोष्टी होत्या की नव्हत्या? मला आव्हान देण्यापेक्षा माझ्या शेतकऱ्यांना मदत द्या. फोन पे वर दोन दोन हजार रुपये वाटले जात आहेत, असा आरोप करतांनाच पोलीसांनी कारवाई करावी, असे आवाहन त्यांनी केले. महापालिकेची निवडणूक ही आमच्या अस्तित्वाची नाही, तर तुमच्या भविष्याची लढाई आहे. पैसे घेऊन आपल्या मुला-बाळांचे भविष्य विकू नका. माझे उमेदवार निष्ठेने उभे आहेत, आम्ही तुमच्यासाठी लढतो आहोत. मला तुम्ही वचन द्या, मी वचननाम्यातील गोष्टी पूर्ण करण्याचे तुम्हाला वचन देतो, अशी ग्वाही उद्धव ठाकरे यांनी सभेतून उपस्थितांना दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.